पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी

Loan waiver of one lakh 40 thousand farmers will be done in Pune district
Loan waiver of one lakh 40 thousand farmers will be done in Pune district

पुणे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ९३८ पात्र शेतकऱ्यांना बाराशे कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू असून, कर्जखात्यात एप्रिलपासून प्रत्यक्ष रक्‍कम जमा होण्यास सुरुवात होऊन मे अखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

जिल्हाधिकारी राम यांनी गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन, बॅंकाना कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना त्रासा शिवाय होण्याच्या सूचना दिल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील कर्जमुक्‍तीबाबतची माहिती दिली. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होत्या. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांपर्यंत कर्जमुक्‍ती योजनेसाठी पुणे जिल्ह्यात एक लाख ४० हजार ९३८ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात आधार प्रमाणीकरणासाठी ‘आपले सरकार केंद्रां’वर आणि बॅंकांमध्ये बायोमेट्रिक मशिन उपलब्ध आहेत. तसेच, रेशन दुकानांमध्ये अडीच हजारांहून अधिक पॉस मशिन उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी पोर्टलवर किंवा प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव आणि कर्जाची रक्‍कम पाहून या केंद्रांवर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. बारामती तालुक्‍यातील मोरगाव व पुरंदर तालुक्‍यातील सासवड येथे प्रायोगिक तत्त्वावर आधार प्रमाणीकरण करण्यात आले. त्यात काही त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. 

जिल्हा बॅंकेचे सर्वाधिक लाभार्थी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमुक्‍ती योजनेचा लाभ देण्यासाठी सुमारे बाराशे कोटी रुपये लागतील. त्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील लाभार्थी शेतकऱ्यांना ९७४ कोटी रुपये, तर अन्य बॅंकांमधील शेतकऱ्यांच्या २१८ कोटी रुपये इतक्‍या कर्ज रकमेचा समावेश आहे, असे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

 पुरंदर विमानतळाचे भूसंपादन मार्चपासून  पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांमधील दोन हजार हेक्‍टर जमिनींच्या भूसंपादनाच्या कामाला मार्चपासून सुरुवात करण्यात येणार आहे. हे भूसंपादन थेट खरेदीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ते करताना शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून आणि त्यांच्या संमतीने करण्यात येणार आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. सुमारे २ हजार ८३२ हेक्‍टर जागा लागणार आहे. तर भूसंपादनासाठी सुमारे ३ हजार कोटींची आवश्‍यकता असणार आहे, अशी माहिती या वेळी जिल्हाधिकारी राम यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com