कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी तीन तास ताटकळले

कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी तीन तास ताटकळले
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी तीन तास ताटकळले

पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभासाठी कराडी (ता. पारोळा) गावाची निवड करण्यात आली होती. मात्र, गावात कर्जमाफी संदर्भात बायोमेट्रीक करताना पोर्टल सुरू करणेसाठी रेंज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना तीन तास ताटकळले. याबाबत ऑनलाइन कर्जमाफी योजनेबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान मंगळवारी (ता. २४) रेंजअभावी ८२ शेतकऱ्यांपैकी ७१ शेतकऱ्यांचे आधार बायोमेट्रीक करण्यात आले.  पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली होती. त्यात कराडी (ता. पारोळा) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे एकूण १६० सभासदांपैकी ८२ शेतकरी पात्र ठरले, ७० सभासद हे नियमित कर्जफेड करणारे आहेत. यात ८२ शेतकऱ्यांचे दोन लाखांतील आतील रकमेत ६४ लाख २६ हजार २७५ रुपयाची कर्जमाफी करण्यात येणार आहे. प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांची यादी लावून त्याचे वाचन करण्यात आले. या वेळी साहाय्यक निबंधक जी. एच. पाटील, जिल्हा बॅंक विभागीय व्यवस्थापक सुभाष पाटील, तालुका लेखा परीक्षक योगेश पाटील, लेखा परीक्षक विलास सोनवणे, सहकार अधिकारी सुनील पाटील, ग्रामसेवक आर. एच. पाटील, सरपंच रतन पुंडलिक पाटील, रेशन दुकानदार प्रफुल पाटील, विकास संस्थेचे चेअरमन डिगंबर पाटील, सचिव मधुकर पाटील, सी. एस. सी. केंद्र चालक संदीप पाटील, विकास सैंदाणे, तलाठी एस. एल. कोळी, पंचायत समिती संग्रामचे कल्पेश अहिरे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.  कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे  गावात कोणत्याही कंपनीची पुरेशी रेंज नसल्याने सीएससी केंद्र चालकाची दमछाक झाली. गावातील अनेक इमारतींवर सहकार विभागाचे अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागले. सकाळी दहापासून रेंजच्या शोधात असलेले अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये निरुत्साह वाढला. ग्रामपंचायतीनंतर येथील स्वस्त धान्य दुकानात रेंज मिळेल, या आशेपोटी महिला व पुरुष शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. मात्र, रेंजअभावी शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागले. सुदाम मराठे यांच्या दोनमजली इमारतीवर प्रयत्न करण्यात आले. शेवटी केंद्र संचालक संदीप पाटील यांनी रवींद्र भगवान पाटील यांचा वरचा मजला गाठला. बरेचसे प्रयत्न केले. तेव्हा गावातील पोलिसपाटील देवचंद नामदेव वानखेडे यांचे आधार बायोमेट्रीक करून योजनेची तब्बल १२.२४ मिनिटांनी सुरुवात झाली. या शेतकऱ्यांचे ५३ हजार रुपये कर्जमाफीची पावती सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिली. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफीबाबत अखेर अल्पमुदत पीककर्ज घेतलेल्या दोन लाखाचा आतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याने काही शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या ७० शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली.  टॉवरची मागणी  युग एकीकडे डिजिटलकडे पाऊले टाकत असताना तेरा हजार लोकसंख्या असलेल्या गावात नेटवर्क मिळत नसल्याने नाराजी व्यक्‍त करण्यात आली. सरपंच व ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करून देखील याबाबत कुठलीच अंमलबजावणी झालेली नाही.   

मुकुंदा पाटील नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही योजनेचा काही लाभ मिळावा. नियमित, अल्पमुदत पीककर्ज अशी विभागणी केल्याने गावातील बरेच शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, याची दखल घ्यावी.  - मुकुंदा पाटील, शेतकरी, कराडी (जि. जळगाव)

कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत. उतारवयात देखील रांगेत उभे राहावे लागले, पण कर्जातून मुक्‍त झाल्याचा आनंद आहे.  - मुक्‍ताबाई पाटील,  शेतकरी, कराडी (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com