कर्जमाफीचे अर्ज करण्यासाठी एक मेपर्यंत मुदतवाढ

कर्जमाफीचे अर्ज करण्यासाठी एक मेपर्यंत मुदतवाढ
कर्जमाफीचे अर्ज करण्यासाठी एक मेपर्यंत मुदतवाढ

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीअंतर्गत काही कारणास्तव अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांसाठी १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. १४) जाहीर केला. यापूर्वी १४ एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.

एक जूनपासून शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह हमीभाव मिळावा या मागणीसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्याआधी सरकारने थकबाकीदार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अशी भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतरही राज्यात शेतकऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने सरकारपुढे पेच निर्माण झाला. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफी व १ लाख ५० हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली. तसेच २०१५-१६, २०१६-१७ या वर्षांत ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचेही घोषित केले होते.

सुरवातीला ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल, अशी घोषणा सरकारने केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. ७६ लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले. छाननीत ६९ लाख अर्ज शिल्लक राहिले. प्रत्यक्षात योजनेअंतर्गत राज्य सरकारने ४६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी दिल्याचे बँकांना कळवले आहे. त्यापैकी आतापर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३७ लाख इतकी असून त्यांच्या खात्यात १४ हजार ७०० कोटी रुपये जमा झाले आहेत.

राज्य शासनाने जे शेतकरी काही कारणास्तव योजनेअंतर्गत अर्ज करू शकलेले नाहीत, त्यांच्यासाठी पहिल्यांदा ३१ मार्च २०१८ पर्यंतची पुन्हा एक संधी दिली होती. त्यानंतर ही मुदत १४ एप्रिलपर्यंत पुन्हा वाढवण्यात आली होती. आता त्याला पुन्हा १ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर वन टाईम सेटेलमेंट योजनेसाठी यापूर्वीच ३० जून २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com