वडाळीच्या तलाठी कार्यालयाला कुलूप

वडाळीच्या तलाठी कार्यालयाला कुलूप
वडाळीच्या तलाठी कार्यालयाला कुलूप

अमरावती  ः तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वडाळी साझा क्रमांक पाचचे तलाठी कार्यालय मागील तीन-चार दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना विविध दाखल्यांपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, दररोज ये-जा करावी लागत असल्याने मजुरीदेखील बुडत आहे. सोमवारी (ता. २३) आठवड्याच्या कामकाजाचा पहिला दिवस असतानाही या कार्यालयाला कुलूप होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अमरावती तालुक्‍यातील वडाळी साझा क्रमांक पाचचे तलाठी कार्यालय भातकुली पंचायत समितीमधील एका खोलीत सुरू आहे. या ठिकाणी विविध दाखले, शेतीचे व प्लॉटचे फेरफारची कामे केली जातात. त्यामुळे या ठिकाणी दिवसभर गर्दी असते. मात्र, तीन-चार दिवसांपासून हे तलाठी कार्यालय बंद असल्याने येथील तलाठी व कर्मचारी गेले तरी कोठे, असा प्रश्‍न येथे येणाऱ्या नागरिकांना पडला आहे. तथापि, संगणकीकरणाचे काम सुरू असल्याने ऑफीस सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सुरू राहील, असे पत्रक दारावर चिकटविले आहे. असे असताना सोमवारी (ता. २३) हे तलाठी कार्यालय दुपारी १२.३० वाजता कुलूपबंद होते. त्यामुळे या ठिकाणी विविध दाखल्यांसाठी; तसेच फेरफारच्या कामांकरिता आलेल्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.  शिवाय येथील तलाठ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याने नागरिकांची निराशा झाली.  

तलाठी सुटीवर मागील तीन-चार दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्याने तलाठी श्री. चपटे सुटीवर आहेत. तथापि, त्यांचा प्रभार राजापेठ येथील तलाठी श्री. भगत यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काही काम असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती अमरावतीचे तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

कर्मचारी गेले कुठे? तलाठ्यांची प्रकृती ठिक नसल्याची माहिती आहे. असे असले तरी येथील कर्मचारी येणाऱ्या नागरिकांचे फॉर्म स्वीकारणे, त्यांना माहिती देणे आदी कामे करतात. मात्र हे कर्मचारीदेखील तीन-चार दिवसांपासून गायब असल्याने हे कार्यालय बंद तर झाले नाही ना, अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली.

नागरिकांना हेलपाटे भातकुली पंचायत समिती ते अमरावती तहसील कार्यालयाचे अंतर जवळपास पाच ते सहा किलोमीटर आहे. एवढ्या अंतरावर जाणे नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे तलाठी नसल्याने आल्यापावलीच परत जात आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com