लॉकडाऊनमुळे कृषी पतपुरवठ्याची ऐशीतैशी

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षभर होणाऱ्या पतपुरवठ्यावर काम करणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याने येत्या खरिपात कर्ज वाटपाचे आव्हान बॅंकांसमोर उभे आहे.
लॉकडाऊनमुळे कृषी पतपुरवठ्याची ऐशीतैशी
लॉकडाऊनमुळे कृषी पतपुरवठ्याची ऐशीतैशी

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षभर होणाऱ्या पतपुरवठ्यावर काम करणारी यंत्रणाच विस्कळीत झाल्याने येत्या खरिपात कर्ज वाटपाचे आव्हान बॅंकांसमोर उभे आहे. लॉकडाऊनमुळे पतपुरवठ्याच्या नियोजनाची ऐशीतैशी झाली असून राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठकही झालेली नाही.

राज्यात खरीप कर्ज वाटपासाठी विशेष मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे. अगदी शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कर्ज वितरण करणारी प्रणाली उभी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्याचा प्राधान्य द्यावे लागेल, असे मत बॅंकिंग क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील बॅंकांच्या समितीची होणारी बैठक यंदा झालीच नाही. ही बैठक एप्रिलमध्येच होते. पण, बॅंकांचे सर्व नियोजन विस्कळीत झालेले आहे. राज्य शासनाच्या पातळीवर देखील या विषयाला सध्या प्राधान्य नसल्याने ही बैठक चालू महिन्यात देखील होते की नाही, झाल्यास त्यातील नियोजनाला कितपत अर्थ राहील, अशी शंका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

गेल्या आर्थिक वर्षात शेती क्षेत्रासाठी ८७ हजार ३२२ कोटीचे कर्ज वाटण्याचे उद्दिष्ट बॅंकर्स समितीने ठरविले होते. प्रत्यक्षात ५१ हजार ५६५ कोटी रुपये वाटले गेले आहेत. शेतकरी वर्गाकडे येणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत बेभरवशाचे बनल्यामुळे कर्ज घेण्यास देखील तो पुढे येत नाही. ज्या ठिकाणी कर्ज हवे आहे तेथे बॅंकांची क्षमता नाही. यंदा देखील लॉकडाऊन व कोरोना स्थितीमुळे उद्दिष्टाप्रमाणे कर्जवाटपाचे नियोजन कोसळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

बॅंकिंग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामापासूनच राज्यातील शेतीचा पतपुरवठा विस्कळीत झालेला आहे. वाटलेली कर्जे आणि वसुली याचे गणित पुरते बिघडले आहे. याला कारण नैसर्गिक आपत्ती व कर्जमाफी होते. मात्र, यात आता लॉकडाऊनची भर पडली आहे. येत्या खरिपासाठी शेतकऱ्यांना वेळेत व भरपूर कर्जे उपलब्ध करून द्यावी लागतील. कारण कृषी आधारित सर्व उद्योगधंदे ठप्प असून शेतकऱ्यांची क्रय शक्ती कमालीची घटली आहे.

एका सहकारी बॅंकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, लॉकडाऊनमुळे शेती क्षेत्रात अभूतपूर्व आर्थिक संकट आले असून यंदाच्या खरिपात वाटली गेलेली कर्जे वसूल होती याची शाश्वती राहिलेली नाही. कोरोना विषाणू साथीचा प्रभाव आणि परिणाम दीर्घ स्वरूपाचे असल्यास शासनाला पुढील वर्षी देखील कर्जमाफीची योजना राबवावी लागेल.

शिखर बॅंकेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा बॅंकांना यंदा किती प्रमाणात कर्ज पुरवठा हवा आहे , या बॅंकांच्या अपेक्षा, सूचना याचे संकलन सुरू आहे. गेल्या हंगामात शिखर बॅंकेने २७०० कोटी रुपयांच्या आसपास जिल्हा बॅंकांना फेरकर्जे दिली होती. एप्रिलपासून जिल्हा बॅकांनी राज्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांना कर्ज पुरवठा सुरू करणे अपेक्षित आहे. या कर्जाच्या पुरवठ्याची स्थिती पाहून जिल्हा बँका पुढे शिखर बँकांकडून फेरकर्ज घेतात. संभाव्य फेरकर्जाचे आकडे अजूनही शिखर बॅंकेकडे आलेले नाहीत.

दरम्यान, पतपुरवठ्याच्या तयारीचा आढावा नाबार्डकडून देखील घेतला जात आहे. “कोरोनाच्या धर्तीवर शेती क्षेत्रातील पत पुरवठ्यांच्या नियमावलीत अजून तरी रिझर्व्ह बॅंकेने बदल केलेला नाही. त्यामुळे आम्ही प्रचलित नियमांचा आधार घेत पतपुरवठ्याचे काम करू. मात्र, आमचा संबंध शेती कर्जांशी थेट येत नाही. शिखर बॅंकेला नाबार्डकडून दिलेल्या कर्जाचे वाटप पुढे जिल्हा बॅंकांना होते,” अशी माहिती नाबार्डच्या सूत्रांनी दिली.

राज्यातील कृषी कर्ज वाटपाचा ढासळता आलेख

आर्थिक वर्ष कर्जाचे उद्दिष्ट प्रत्यक्षात वाटलेले कर्ज
२०१८-१९ ८५ हजार ४६४ कोटी रुपये ५३ हजार २४० कोटी रुपये
२०१९-२० ८७ हजार ३२२ कोटी रुपये ५१ हजार ५६५ कोटी रुपये
(आकडेवारी संबंधित आर्थिक वर्षातील ३१ डिसेंबरअखेरची आहे.)

राज्यातील पीककर्ज वाटपाची दोलायमान स्थिती

बॅंक श्रेणी कर्जाचे उद्दिष्ट प्रत्यक्षात वाटलेले कर्ज
जिल्हा बॅंकां १८ हजार १५६ कोटी रुपये. ९ हजार ६३१ कोटी रुपये
इतर बॅंकां ४१ हजार ६१० कोटी रुपये १६ हजार १३७ कोटी रुपये
(आकडेवारी ३१ जानेवारी २०२० रोजी असलेल्या स्थितीची आहे.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com