तापी नदीवरील उपसा सिंचन योजना बंदच

तापी नदीवरील उपसा सिंचन योजना बंदच
तापी नदीवरील उपसा सिंचन योजना बंदच

जळगाव :खानदेशातील अनेक उपसा सिंचन योजना बंदावस्थेत असून, वारंवार मागणी करूनही या योजनांबाबत कार्यवाही होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. दुष्काळी स्थिती लक्षात घेता या योजना सुरू होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.  

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा उपविभागांतर्गत असलेल्या तापी नदीवरील प्रकाशा, सारंगखेडा भागातील सुमारे ५३ उपसा सिंचन योजना बंद आहेत. या योजनांच्या माध्यमातून शिंदखेडा, शहादा व शिरपूरमधील काही भागाला लाभ होऊ शकतो. पाटण (ता. शिंदखेडा) येथील ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी या योजनांबाबत तळोदा येथील उपविभागाकडे पाठपुरावा केला आहे, परंतु या योजनांची समस्या सोडविण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही या विभागाकडून झाली नाही. सारंगखेडा व प्रकाशा येथे तापी नदीवर बॅरेज आहे. त्यात चांगला जलसंचय मागील पाच-सहा वर्षांपासून होत आहे. परंतु हे पाणी शेतापर्यंत पोचविण्यासंबंधी कार्यवाही होत नाही. 

नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्‍यातील सुमारे चार ते पाच हजार हेक्‍टरला लाभदायी ठरू शकणाऱ्या बुराई प्रकल्पात तापी नदीवरून मोठ्या जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासंबंधीची योजनाही थंड बस्त्यात आहे. या योजनेसाठी मध्यंतरी नंदुरबार-दोंडाईचा महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. बुराई प्रकल्प नेहमी कोरडाच असतो. त्यात जलसंचयासाठी कोणतेही ठोस स्त्रोत नाही. हा भाग बारमाही आवर्षणप्रवण असल्याने शिवारासह गावांमध्येही मोठी पाणीटंचाई असते.ती दूर होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणावरील डाव्या कालव्यावर यावल, रावेर व चोपडा तालुक्‍यात सुमारे ४० गावांमध्ये उपसा सिंचन योजनेद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु, या योजना बंद पडल्या. पाणी येत नाही. परंतु थकबाकीची समस्या जलसंपदा विभाग वारंवार सांगतो. तापी नदीवरील बोदवड उपसा सिंचन योजनेसंबंधीदेखील संथ गतीने काम सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com