टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकाव

रब्बी हंगामातच टोळधाड राज्याच्या काही भागात येण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभाग आधीपासूनच या किडीच्या नियंत्रणासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र कृषी औद्योगीक विकास मंडळाला या किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा पुरवठा करण्याचे आदेश देखील यापूर्वीच दिले आहेत. टोळधाडीच्या नियंत्रणाकरीता तज्ज्ञांचे एक पथक पाठविण्यात आले आहे. त्यांच्या शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाईल. सध्या प्रादुर्भाव कमी असल्याने हवेतून फवारणीची गरज नाही. ​—सुहास दिवसे, कृषी आयुक्‍त
locust
locust

अमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोरील आव्हान टोळधाडीच्या संकटामुळे वाढले आहे. सातपुडा पर्वतरांगाच्या लगतच्या संत्रा उत्पादक गावांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यानंतर या टोळधाडीने वर्धा जिल्ह्यातील आष्टी परिसराकडे आपला मोर्चा वळविला. संत्रा झाडावर फुटणारी नवती आणि भाजीपाला पिकांना टोळधाडीने आपले लक्ष्य केले आहे. पाकिस्तानातून राजस्थानात दाखल झाल्यानंतर तेथून मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये थैमान घातल्यानंतर टोळधाड रविवारी (ता.२४) सायंकाळी अमरावती जिल्हयात दाखल झाली. मोर्शी या संत्रा उत्पादक तालुक्‍यातील सातपुडा पर्वतरांगालगत असलेल्या पट्टयात टोळधाडीचे थवे पोचले. भाईपूर, तुळजापूर, पाडा, भिवकुंडी, सालबर्डी, डोंगरयावली, घोडदेव, दापोरी, धानोरा, तरोडा, चिंचोली गवळी, सुपाडा या गावांमधील भाजीपाला उत्पादकांचे नुकसान टोळधाडीने केले.

संतोष पेठे यांची चार एकरांवरील चवळी टोळधाडीने अवघ्या काही मिनीटातच फस्त केल्याची माहिती त्यांनी दिली. चार एकरावरील भेंडीवर किडनाशकाची काही तासापूर्वीच फवारणी केली असल्याने हे पीक वाचले. संत्रा झाडावरील नवती (नवीन पालवी) देखील टोळधाडीचे खाद्य ठरले. अमरावतीत अपेक्षीत खाद्य न मिळाल्याने या किडीने नंतर लगतच्याच वर्धा जिल्ह्यातील आष्टी परिसरातील भागात आपला मोर्चा हलविला. त्या ठिकाणी देखील भाजीपाला व्यतिरिक्‍त मोठ्या प्रमाणावर आवश्‍यक खाद्यान्न न मिळाल्याने ही टोळधाड पुढे मार्गक्रमण करण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.  

डॉ. प्रशांत उंबरकर, पिक संरक्षण शास्त्रज्ञ  यांनी सुचविलेले उपाय पुढीलप्रमाणे

  • टोळधाडीच्या पुढे येणाऱ्या थव्याच्या वाटेवर ६० त ७५ सेमी चर खोदल्यास पिलांचा अटकाव करता येतो.
  • दिवसा टोळधाड शेतात आढळल्यास थाळी, ढोल, ताश, डब्बे जोरात वाजवावे. 
  • रात्रीच्या वेळेस झाडावर, झुडपावर टोळ जमा होतात. अशावेळी शेतामध्ये धूर करावा.
  • केंद्रीय किटकनाशक बोर्ड आणि पंजीकरण समिती यांनी शिफारस केलेल्या किटकनाशकाची फवारणी करावी.  
  • टोळधाड नियंत्रण सल्ला   सध्या मध्यप्रदेशातील देवास, रतलाम भागातून विदर्भातील मोर्शी, वरूड भागातील संत्रा पिकावर टोळधाडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना ः 

  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित कीटकनाशक ॲझाडीरेक्टीन (१५०० पीपीएम) ४५ मिलि  प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • आमिषाचा वापर ः  २० किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये फिप्रोनील (५ एससी) ३ मिलि मिसळावे. याचे ढीग शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळधाड आकर्षित होतात. कीडनाशकामुळे ते मरतात.
  • जास्त प्रादुर्भाव असेल तर ‘सीआयबीआरसी‘ने सुचविलेल्या उपाययोजना ः कीटकनाशकाची फवारणी ः प्रति १० लिटर पाणी  - लॅंम्बडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) १० मिलि किंवा - क्लोरपायरिफॉस(२० इसी) २४ मिलि किंवा - मॅलॅथिऑन (५० टक्के इसी) ३७ मिलि.
  • - डॉ.बी.बी.उंदीरवाडे, - डॉ.ए.के.सदावर्ते, ९६५७७२५६९७ (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) नुकसान भरपाई द्याः डॉ. बोंडे मध्यप्रदेश सरकारने अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण परिसराची फवारणी करुन या टोळधाडीवर नियंत्रण मिळवले. त्याचप्रमाणे कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घेत मोर्शी, पाळा, भाईपूर, हिवरखेड परिसरात प्रभावी उपाययोजना कराव्यात. त्यासोबचत नुकसान झालेल्या भागाचे सर्व्हेक्षण करुन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. प्रतिक्रिया टोळधाड समूहाने हवेच्या दिशेने दिवसा मोठ्या संख्येने मार्गक्रमण करतात. सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी समूहाने झाडा, झुडपावर सकाळपर्यंत बसतात. त्या ठिकाणी चांगले खाद्य उपलब्ध असले तर तेथेच स्थिरावतात; अन्यथा परत समूहाने सकाळी खाद्याच्या शोधात हवेच्या दिशेने पुढे मार्गक्रमण करतात. अशावेळी सायंकाळी हा समूह स्थिरावण्याची शक्‍यता असल्यास किंवा समूह स्थिरावलेला असल्यास ठिकठिकाणी मशाल, पुंजे (शेतातील कचरा) जाळून त्यांना पळवून लावता येते.  — डॉ. अनिल कोल्हे, किटकशास्त्रज्ञ,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com