भारत-पाकिस्तानात जूनमध्ये टोळधाडीचे आक्रमण शक्य : एफएओचा इशारा

जगाला टोळधाडीचा धोका कायम असून अनेक दशकांपासून हे संकट येत आहे. वाळवंटीय टोळ ही एक चिंताजनक कीड आहे. यामुळे जगाची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते. - केथ क्रेसमॅन, वरिष्ठ टोळधाड अंदाजअधिकारी, ‘एफएओ’
locust
locust

संयुक्त राष्ट्रसंघ: टोळधाडीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे अन्नसुरक्षा आणि लोकांचे जीवनमान प्रभावीत होत आहे. भारत आणि पाकिस्तानला यंदा टोळधाडीचा जास्त धोका आहे. जून महिन्यात पूर्व आफ्रिकेतून वाळवंटीय टोळधाड भारत आणि पाकिस्तानमध्ये दाखल होण्याची शक्यता असून सध्या या भागात असलेल्या टोळांसोबत पिकांवर आक्रमण करतील, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) अन्न आणि कृषी संस्थेने दिला आहे.  वाळवंटीय टोळधाड ही स्थलांतरीत होणारी जगातील सर्वाधिक विध्वंसक किड आहे. टोळचा एका थवा एक किलोमीटरपर्यंतचा परिसर व्यापून टाकतो तर एका थव्यात ८ कोटी टोळ असू शकतात. ‘‘सध्या पूर्व आफ्रिकेतील स्थिती वाळवंटीय टोळधाडीमुळे चिंताजनक बनली आहे. येथील अन्नसुरक्षा आणि जीवनमान धोक्यात आले आहे. परंतू, टोळधाड पुढील महिन्यात किंवा त्यानंतर पश्‍चिम आफ्रिका भागातही पसरेल. तसेच हिंद महासागरावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये टोळधाड प्रवेश करेल,’’ असे ‘एफएओ’चे वरिष्ठ टोळधाड अंदाज अधिकारी केथ क्रेसमॅन यांनी सांगितले. 

आफ्रिकन देशांत धुडगूस सध्या टोळधाडीने आफ्रिकन देशांमध्ये धुडगूस घातला आहे. सध्या केनिया, सोमालिया, इथोपिया या देशांमध्ये टोळधाड पिकांचे मोठे नुकसान करत आहे. तर दक्षिण इराण आणि पाकिस्तानच्या काही भागातही नुकसानीची पातळी वाढली आहे. पुढील महिन्यात टोळ इथोपियामधून केनियात दाखल होतील तसेच सुदान आणि पूर्व आफ्रिकेत पसरतील, अशी शक्यता आहे. 

भारत, पाकिस्तानमध्ये नुकसान वाढेल दक्षिण इराण आणि नैऋत्य पाकिस्तानमधील टोळ भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागात पुढील महिन्यात स्थलांतर करतील. तर या टोळांना पूर्व आफ्रिका, उत्तर सोमालियामधील टोळ स्थलांतर करून सामील होतील. त्यामुळे या भागातील नुकसानीची पातळी वाढण्याची शक्यता आहे. 

भारताकडून संघटीत नियंत्रणाचा प्रस्ताव वाळंटीय टोळधाडीचा वाढता धोका लक्षात घेऊन भारत सरकारने पाकिस्तान आणि इराण या देशांपुढे संघटितपणे नियंत्रणात्मक उपाय करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. इराणने भारताच्या प्रस्तावाला होकार देत एकत्रीत लढा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर पाकिस्तानने अद्यापही आपली प्रतिक्रिया कळविली नाही, अशी माहित सूत्रांनी दिली. अनेक देशांत राबवावी लागणार टोळ नियंत्रण मोहिमः एफएओ ‘एफएओ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही टोळ नियंत्रणासाठी सध्या केनिया, सोमालिया आणि इथोपिया देशांवर भर दिला आहे. मात्र येणाऱ्या काळात येमेन, इराण, पाकिस्तान आणि पूर्व आफ्रिकेवर लक्ष देण्याची गरज आहे. ‘एफएओने जानेवारीत ‘डेझर्ट लोकस्ट अपील’ प्रसारीत केले. यात दहा देशांना टोळधाडीच्या आक्रमणाचा सर्वाधीक धोका असल्याचे म्हटले आहे. जिबुटी, इरिट्रीया, इथोपिया, केनिया, सोमालिया, दक्षिण सुदान, सुदान, युगांडा, टांझानिया आणि येमेन या देशांना इशारा देण्यात आला आहे. टोळधाडीचे यंदा वेळेआधीच आक्रमण पाकिस्तानमधून टोळधाडीने राजस्थान, पंजाब, हरियाना आणि मध्य प्रदेशात प्रवेश केला आहे. टोळधाडीने या राज्यांतील पिकांचा फडशा पाडण्यास सुरुवात केली आहे.  यात कापूस आणि भाजीपाला पिकांचा समावेश आहे. राजस्थानला सर्वाधिक फटका बसला आहे. एरव्ही भारतात टोळधाडीचे जून आणि जुलै महिन्यात आगमन होते. मात्र यंदा वेळेच्या आधीच पाकिस्तानमधून टोळधाडीने आक्रमण केले आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. टोळधाड येणाच्या काळात प्रादुर्भावग्रस्त राज्ये नियंत्रणात्मक उपाय करतात. मध्य प्रदेशातील उज्जैन आणि देवास जिल्ह्यात सहा टोळधाडी आढळल्या आहेत. तसेच गुजरातमधील बनासकांठा आणि पाटन जिल्ह्यातही टोळधाडी आढळून आल्या आहेत. २.५ कोटी लोकांना भयंकर अन्नटंचाई भासेल आफ्रिकन देशांमध्ये टोळधाडीचे आक्रमण वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या चिंताजनक परिस्थितीत पूर्व आफ्रिका प्रदेशात नुकसानीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अन्न संकटाच्या जागतीक अहवालात पूर्व आफ्रिका प्रदेशात अन्न टंचाईची भीषणता दर्शविण्यात आली आहे. ‘‘२०२० वर्षाच्या मध्यानंतर पूर्व आफ्रिका प्रदेशातील जवळपास २.५ कोटी लोकसंख्येला तीव्र स्वरुपाची अन्न असुरक्षा जाणवेल. तसेच येमेनमध्ये टोळधाडीचे संकट वाढतच आहे. येथील १.७ कोटी लोकसंख्येला तीव्र अन्न टंचाईला सामोरे जावे लागणार आहे,’’ असे अहवालात म्हटले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com