मक्यावर आता टोळधाडीचे संकट; जोतिबाची वाडीत नाकतोड्याचा प्रादुर्भाव

सध्या ठरावीक भागात व थोड्या क्षेत्रावर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव असला तरी, पुढील धोका टाळण्यासाठी याबाबतचा प्राथमिक अहवाल कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कृषी विभाग यांना दिला आहे. याबाबत वेळोवेळी निरीक्षण सुरू असून, कृषी विभाग सतर्क आहे. - बी. यु. मंगरूळकर, उपविभागीय कृषी अधिकारी, भूम
टोळधाड
टोळधाड

पुणे : मका पिकावर सध्या अमेरिकन लष्करी अळीने थैमान घातले असतानाच संकटात भर म्हणून की काय, उस्मानाबाद जिल्ह्यात मौजे जोतिबाची वाडी व परिसरातील काही गावांत चाऱ्यासाठीच्या मका पिकावर नाकतोडा (ग्रासहॉपर) किडीचा अनपेक्षित व मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीने केवळ पानांच्या शिराच बाकी ठेवल्या आहेत.  दरम्यान, स्थानिक कृषी विभागाने परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाकडे संपर्क साधला असून, तेथील शास्त्रज्ञांच्या भेटीनंतर त्वरित उपाययोजना केल्या जाणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात भूम तालुक्यातील मौजे जोतिबाची वाडी गाव व परिसरातील काही गावांत चाऱ्यासाठी मका मोठ्या प्रमाणात घेतला जातो. या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या अनुषंगाने पीक पाहणी करत असताना इटचे मंडल कृषी अधिकारी निखिल रायकर यांना मक्यावर नाकतोडा या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. याबाबत ते म्हणाले की मौजे जोतिबाची वाडी गावातील गणेश हनुमंत दाबेकर यांचा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून सुमारे एक हेक्टरवर मका आहे. या पिकाचे सुमारे ६० ते ७० टक्के नुकसान या किडीने केले आहे. मोठ्या संख्येने हल्ला करून केवळ मका पिकाचे ताट आणि पानाच्या शिराच बाकी ठेवल्या आहेत. या गावाच्या परिसरातील सात ते आठ गावांतही चारा मका क्षेत्रावर या किडीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. 

सध्या फुलोरा अवस्था ते कणीस भरण्याच्या अवस्थेत मका आहे. या किडीचा पाने खाण्याचा वेग अतिउच्च असल्याने प्रादुर्भाव सुरू केल्यापासून काही दिवसांतच मक्याच्या पानाच्या फक्त शिराच बाकी शिल्लक राहिलेल्या दिसून येतात.

कृषी विद्यापीठाशी संपर्क दरम्यान आम्ही परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाशी संपर्क केला असून, तेथील शास्त्रज्ञांची भेट लवकरच या भागात होणार असल्याचे श्री. रायकर यांनी सांगितले. त्यानंतर त्वरित शेतकऱ्यांना उपाययोजना देऊन जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  रायकर म्हणाले, की सुरुवातीला मक्यावरील लष्करी अळी असेच शेतकऱ्यांना वाटत होते. आता मात्र नाकतोड्यांची संख्या वाढल्याने लवकरात लवकर मार्गदर्शन होण्याची त्यांनाही प्रतीक्षा आहे.  वेळीच नियंत्रण करणे गरजेचे सिक्थ ग्रेन या कंपनीचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. अंकुश चोरमुले म्हणाले, की मक्यावरील नाकतोडा (Hieroglyphus nigrorepletus) असे या किडीचे शास्त्रीय नाव असून, इंग्रजीमध्ये मेझ ग्रासहॉपर किंवा फडका ग्रासहॉपर असे यास संबोधले जाते. उस्मानाबाद भागात नाकतोड्यांचा मका पिकावर झालेला प्रादुर्भाव चिंताजनक आहे. एवढे मोठे नुकसान महाराष्ट्रात बहुधा प्रथमच नोंदवण्यात आले असावे. पावसाने दिलेला ताण व कोरडे हवामान यामुळे प्रादुर्भाव त्या भागात वाढला असण्याची दाट शक्यता आहे. नाकतोड्यांची पिले आणि प्रौढ अशा दोन्ही अवस्था पिकाची पाने खाऊन नुकसान करतात. प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असल्यास केवळ पानांच्या शिरा दिसून येतात. त्यामुळे किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com