टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक नुकसान; तीन जिल्ह्यात प्रादुर्भाव

काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्‍वर, नागपूर ग्रामीण, वर्धा जिल्ह्यातील आष्टी, अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या भागातील शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज आहे. कडुनिंबाच्या पाण्याचा धूर करणे, क्‍लोरपायरिफॉसची फवारणी करावी. - रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर.
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक नुकसान; तीन जिल्ह्यात प्रादुर्भाव
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक नुकसान; तीन जिल्ह्यात प्रादुर्भाव

नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा प्रादुर्भाव पूर्व विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात झाला आहे. भाजीपाला पिकांचा फडशा टोळधाडीने पाडला असून संत्रा, मोसंबी झाडांवरील नवती देखील फस्त केली आहे. भाजीपाला उत्पादकांचे नागपूर, अमरावती जिल्ह्यात सुमारे ५० टक्‍क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावरील नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. वीस कोटींपेक्षा अधिकच्या झुंडीत असलेली ही कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे.  मध्यप्रदेश मार्गे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्‍यातील डोमा, चुरणी, बगदरी भागात सर्वात आधी टोळधाड दाखल झाली. या भागात आदिवासी शेतकरी वांगी, चवळी तसेच इतर वेलवर्गीय पिके घेतात. भाजीपाल्याचे सुमारे २५ ते ३० टक्‍के नुकसान या किडीने केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यानंतर मोर्शी तालुक्‍यातील भिवकुंडी, पाळा या भागात संत्रा झाडावरील नवतीचा फडशा टोळधाडीकडून पाळण्यात आला. सध्या आंबिया बहारातील लिंबाच्या आकाराची फळे झाडावर आहेत. संत्रा उत्पादकांचे देखील ३० ते ३५ टक्‍के नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  नागपूर जिल्ह्यात २५ टक्‍के नुकसान  सोमवारी (ता.२५) रात्री काटोल आणि त्यानंतर कळमेश्‍वर तालुक्‍यात दाखल झालेल्या टोळधाडीकडून या भागातील संत्र्यासोबतच मोसंबीवरील नवतीचा फडशा पाडला गेला. चवळी, वांगी, भेंडी यासारख्या भाजीपाल्याचे उत्पादन या दोन्ही तालुक्‍यात होते. सुमारे २५ टक्‍के क्षेत्रावरील भाजीपाला पूर्णपणे या किडीने फस्त केला. कृषी विभागाच्या ढिवरवाडी नर्सरीतही किडीने नुकसान केले. अनिल ठाकरे यांनी नव्याने लागवड केलेल्या मोसंबीची पालवी देखील किडीने खात केवळ फांद्याच शिल्लक ठेवल्या.  तब्बल १५ किलोमीटर लांब टोळधाड  काटोल परिसरात सद्यःस्थितीत १५ किलोमीटर लांब आणि दोन किलोमीटर रुंद अशा भागात टोळधाडीचा थवा आहे. ३० चौरस किलोमीटर भाग टोळधाडीने व्यापला असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. सद्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात असलेला टोळधाडीचा एकच थवा आहे. या थव्यातील किडीची संख्या तब्बल वीस कोटींच्या घरात आहे. हवेच्या दिशेने तो मार्गक्रमण करीत असल्याने रात्री अंधार पडल्यानंतरच त्याच्या स्थितीबाबत स्पष्टता होते.  ४५० लीटर रसायनाची फवारणी  टोळधाड नियंत्रण रात्रीच शक्‍य असल्याने नागपूर विभागात अग्निशमनाचे दोन बंब वापरून फवारणी करण्यात आली. शेतकऱ्यांकडील चार ट्रॅक्‍टरचलीत ब्लोअरचा वापर करण्यात आला. रात्रभरात सुमारे २५० लीटर क्‍लोरपायरिफॉस २० इसी या कीटकनाशकाची फवारणी केली गेली. २.४ मिली प्रती लीटर या मात्रेत कीटकनाशक होते, असे नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी सांगीतले. अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांचे पथकही रात्रभर शिवारातच होते. दोन अग्निशमन बंब तसेच शेतकऱ्यांकडील ब्लोअरच्या माध्यमातून २०० लीटर रसायनाची फवारणी करण्यात आली. याप्रकारे सुमारे ४५० लीटर रसायन नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात टोळधाड नियंत्रणासाठी वापरण्यात आले. 

प्रतिक्रिया दोन ब्लोअर फवारणी कामी सज्ज आहेत. क्‍लोरपायरिफॉस २० ईसी हे कीटकनाशक आणून ठेवले आहे. पाण्याच्या टाक्‍या पण भरून ठेवल्या. काही भागात टायर जाळले, मजुरांना लोखंडी पिंपे देत ते वाजविण्यास सांगितले. अशाप्रकारची पूर्वतयारी केली आहे. यापूर्वी किडीने चार एकरातील चवळीचा फडशा पाडल्याने नुकसान झाले. परिणामी आता सावधगिरी बाळगत आहे.  - संतोष पेठे, भिवकुंडी, ता. मोर्शी, अमरावती 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com