टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला नागपुरात 

गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी टोळधाड बुधवारी (ता.३) सावनेर तालुक्‍यातून पुढे मध्यप्रदेशातील पांढूर्णाकडे सरकल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
drone
drone

नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी टोळधाड बुधवारी (ता.३) सावनेर तालुक्‍यातून पुढे मध्यप्रदेशातील पांढूर्णाकडे सरकल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. विशेष म्हणजे नागपूर दौऱ्यावर असलेल्या कृषीमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता.२) अवघ्या दोन दिवसात टोळधाडीच्या नियंत्रणाचा दावा केला होता.  राजस्थानातून मध्यप्रदेशात दाखल झालेल्या टोळधाडीने सातपुडा पर्वतरांगा ओलांडत २४ मे रोजी अमरावती जिल्ह्यातील संत्र्याचे आगार असलेल्या मोर्शी, वरुड तालुक्‍यात प्रवेश केला होता. त्यानंतर चार गटात या किडीचा झुंड विभागल्या गेल्या. त्यातील एक भंडारा, एक वर्धा एक नागपूर तर एक अमरावती जिल्हयात होता. काटोल तालुक्‍यात किडीने संत्रा, मोसंबीची नवती फस्त केली तर ज्या ठिकाणी खाण्यासाठी काहीच मिळाले नाही अशा भागात कडुनिंबाच्या झाडावरील हिरव्या पानांसह सागवान झाडाची पाने, भाजीपाल्याचा फडशा या किडीने पाडला. संत्रापट्टयात या किडीने सर्वाधीक नुकसान केल्याची माहिती सूत्रांनी दिली.  धानपट्टयात किडीकडून उन्हाळी धानाला देखील लक्ष्य करण्याची भिती वर्तविली जात होती. शेतकऱ्यांसह कृषी विभागाची चिंता यामुळे वाढीस लागली होती. तोंडावर असलेल्या खरिपातील पिकांनाही या किडीचा धोका असल्याने या चिंतेत अधिकच वाढ झाली. त्यामुळे नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजनांवर भर देण्यासाठी ड्रोन किंवा हेलिकॉप्टरचा वापर करण्याची मागणी होऊ लागली.  अखेर ड्रोन दाखल  कृषीमंत्री दादा भुसे हे मंगळवारी (ता.२) नागपूर दौऱ्यावर होते. याच दिवशी ॲग्रोवनमध्ये टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या उपलब्धतेबाबत अनिश्‍चीततादर्शक वृत्त प्रकाशीत केले होते. त्यानंतर तत्काळ हालचाल होत बुधवारी (ता.३) पुण्यावरून एका खासगी कंपनीकडून फवारणी ड्रोनची उपलब्धता करण्यात आली. त्याची चाचणी देखील कृषिमंत्र्यांसमोर घेण्यात आली. आता मात्र टोळधाड उरली नसल्याने आठवडाभर ड्रोनला नागपुरात ठेवले जाणार आहे. या ड्रोनला चार नोझल असून दहा लिटरची त्याची क्षमता आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com