पार्थ चक्रव्यूह भेदणार की बारणे भगवा फडकवणार? 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   ः यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघ राज्यात लक्षवेधी ठरला आहे. पार्थ पवार यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी होत आहे. यामुळे या लढतीत पार्थ चक्रव्यूह भेदणार, की बारणे पुन्हा भगवा फडकवणार याचीच चर्चा आहे. बारणे यांच्या विजयश्रीमध्ये पिंपरी-चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्‍मण जगताप यांची भूमिका निर्णायक ठरेल. 

मावळमधील पिंपरी-चिंचवड आणि मावळ हे मतदारसंघ घाटावर आहेत. तर पनवेल, कर्जत आणि उरण हे तीन मतदारसंघ घाटाखाली कोकणात विभागले आहेत. यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोचण्यासाठी कसब पणाला लावावे लागणार आहे. या मतदारसंघाचा विद्यमान खासदार बारणे यांना अनुभव आहे. तर पार्थ पवार यांना मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेत त्यांचे स्वकीय भाजपमध्ये गेल्याने

सध्या मतदारसंघात शिवसेना भाजपचे वर्चस्व आहे. तर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरी, अनेक नगरसेवक हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे असल्याने पार्थ पवार यांच्यासाठी त्यांची छुपी मदत मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास बारणे यांची लढत अधिक कडवी होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत शिवसेना-भाजपचे आमदार आहेत. पार्थ पवार यांच्या उमेदवारीला कॉँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी, रिपब्लिकन पक्ष, मनसे, कवाडे गट यांचाही पाठिंबा आहे. मतदारसंघातील नसतानाही पार्थ पवार यांना आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले. मात्र, मतदार स्वीकारणार का, यावरही त्यांची कामगिरी अवलंबून असणार आहे.

शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मावळ आणि रायगडमधून शिवसेनेला हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. ही बाब पार्थ पवार यांच्यासाठी जमेची ठरणारी आहे. पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे पूर्वाश्रमीचे अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शेकापकडून निवडणूक लढली. या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून राहुल नार्वेकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत नार्वेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. यानंतर आमदार जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पिंपरीमधून विधानसभा निवडणूक लढवून ते जिंकले होते. जगताप आणि बारणे यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. ही दिलजमाई नाही झाली, तर हे बारणे यांना धोकादायक ठरू शकते. तर आमदार जगताप हे अजित पवार यांच्याशी असलेली जुनी मैत्री निभावतात, की युतीधर्म पाळतात यावर बारणे यांची भिस्त असणार आहे. 

बारणे-जगताप दिलजमाई?  दरम्यान नुकतेच शिवसेना भाजपच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि सहसंपर्क प्रमुख प्रशांत बधे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत, मनोमिलन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी युतीधर्म पाळण्याचे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले. तर बारणे यांनीदेखील जगताप यांची भेट घेतली. या भेटीगाठींमधून आमदार जगताप यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आमदार जगताप यांची नाराजी दूर होऊन त्यांनी एकदिलाने काम केल्यास पार्थ पवार यांना लढाई अधिक कठीण होण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com