साताऱ्यात भाजप-राष्ट्रवादीत संघर्ष

साताऱ्यात भाजप-राष्ट्रवादीत संघर्ष
साताऱ्यात भाजप-राष्ट्रवादीत संघर्ष

सातारा  ः सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) व माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव भाजप-शिवेसना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपत संघर्ष होणार हे स्पष्टच आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उदयनराजे यांच्याविषयी असलेल्या नाराजीकडे दुर्लक्ष करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली. पक्षाच्या उमेदवारासाठी आपापसांतील मतभेद मिटवण्याचा सल्लाही विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिला. त्यानुसार या नेत्यांनी आपापसांतील वाद मिटवून निवडणुकीच्या प्रचारास सुरवात केली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पाच आमदारांची ताकद उदयनराजे यांच्या पाठीशी आहे. आघाडीतून कॉँग्रेसच्या दोन आमदारांची मदत त्यांना होणार आहे. तसेच उदयनराजे यांचा समर्थकांचा गोतावळाही मोठा आहे. त्यामुळे त्यांना सध्यातरी ही निवडणूक जड जाणार नाही अशी स्थिती आहे. 

राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार नाही व ते भाजपत येतील अशी वाट पाहत बसलेल्या भाजपच्या नेत्यांना शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात केलेला उमदेवार द्यावा लागला आहे. त्यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना भाजपमधून शिवसेनेत पाठवून उमदेवारी दिली आहे. त्यांच्या मागे माथाडींची ताकद आहे.  राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने चांगले रान उठवले असून, त्यांना शिवसेनेची साथ मिळाली आहे. यामुळे उदयनराजे भोसले विरुद्ध नरेंद्र पाटील अशी चुरशीची लढत होत आहे. या मतदारसंघात रिपाइं कोणासोबत राहणार यांची उत्सुकता आहे. कारण मागील निवडणुकीत अशोक गायकवाड यांना ७१ हजार मते मिळाली होती. या वेळेस अद्यापतरी रिपाइं पक्ष उदयनराजे यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे.  

नरेंद्र पाटील यांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे, तर उदयनराजे भोसले यांनी प्रत्येक विधानसभा संघात संपर्क मोहीम सुरू ठेवली आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण या विधानसभा मतदारसंघात नाराजी दिसत आहे. ही नाराजी नरेंद्र पाटील कॅश करण्यात यशस्वी होणार का, हा प्रश्न आहे. पाटण, कराड, जावली, महाबळेश्वर, सातारा या तालुक्यांत माथाडींची संख्या मोठी आहे. त्यामुळे माथाडींची सर्व मते पाटील यांच्या सोबत राहण्याची शक्यता आहे. पाटील यांच्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्यासोबत बूथ पातळीवर शिवसेनेही चांगली बांधणी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिरकाव केला आहे. आता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेची बांधणी करत आहेत. त्यामुळे आघाडी आणि युतीच्या रणसंग्रामात भाजप बालेकिल्ल्यास खिंडार पाडणार का राष्ट्रवादी कॉँग्रेस एकहाती विजय मिळवणार याची उत्सुकता आहे.

या मतदारसंघात शेंलेंद्र वीर हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. बळिराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे यांच्यासह तीन अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com