संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला, बुलडाण्यात सुरू होणार प्रचारसभांचा धडाका

अकोला : अकोला, बुलडाणा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या भागांत आता प्रचारसभांचा धडाका सुरु होणार आहे. वाशीममध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत असून गुरुवारी (ता. ११) मतदान होणार आहे.    

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघात आतापर्यंत एकाही मोठ्या नेत्याची जाहीरसभा झालेली नाही. लोकसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभा घेतली. पंकजा मुंडे यांनी रिसोडमध्ये सभा घेत भाजप उमेदवारासाठी मते मागितली. आता प्रचारासाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक असल्याने आठवडाभरात जाहीर सभांचा धडाका सुरू होण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने युतीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे तर काँग्रेस आघाडीसाठी शरद पवार, छगन भुजबळ, अशोक चव्हाण यांच्यासह इतर केंद्रीय नेत्यांच्या सभा होण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीने खासदार ओवैसी यांची नियोजीत सभा रद्द केली. ॲड. आंबेडकरच प्रचाराची बाजू सांभाळत आहेत.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात मात्र प्रचाराचा धुराळा उडत आहे. शिवसेना - भाजपचे उमेदवार प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या थेट लढत होत आहे. वंचित आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार आता सुरवातीसारखे स्पर्धेत दिसत नाही. जाधव-शिंगणे यांच्यात थेट लढाई असून प्रचारात जोरात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. याही मतदारसंघात मोठ्या नेत्यांच्या सभा अद्याप झालेल्या नाही. या आठवड्यात सभांचे नियोजन आहे.   

वाशीममध्ये तुल्यबळ लढत; उद्या मतदान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (ता.११) मतदान होणार आहे. वऱ्हाडातील यवतमाळ-वाशीम मतदारसंघात या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. ९) प्रचारतोफा थंडावल्या. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात गुरुवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी रॅली, रोड शो व स्टार प्रचारकांच्या सभांवर भर दिला आहे. या मतदारसंघात सर्वच उमेदवारांकडून वाशीम जिल्ह्यावर फारसे लक्ष देण्यात आले नाही. प्रचाराचा जोश तेथे दिसून येत नव्हता. उमेदवारांचे लक्ष यवतमाळ जिल्ह्यातील प्रचारावर अधिक होते.

शिवसेना भाजप युतीकडून विद्यमान खासदार भावना गवळी तर विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरविले आहे. या दोघांमध्येच थेट लढत होत आहे. खासदार गवळी यांच्याविषयी यवतमाळ जिल्ह्यात मोठी नाराजी आहे. युतीतील नेतेही त्यांच्यासोबत तुलनेने कमी दिसले. काँग्रेसने यवतमाळसाठी मोठा जोर लावला. ग्रामीण भागात ठाकरे यांना ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे याठिकाणची लढत तुल्यबळ होऊन अनपेक्षित निकाल येण्याची शक्यता जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com