निवडणुकीनंतर सर्वच शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार : पंतप्रधान मोदी

औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा
औसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा

औसा, जि. लातूर   ः पंतप्रधान किसान सन्मान योजना राबवली जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार आल्यास या योजनेची व्याप्ती वाढवून देशातील साठ वर्षांवरील सर्वच शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केली.

लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. ९) आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जून खोतकर आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. मोदी म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी धोरण राबवले जात आहे. आता निवडणुकीनंतर साठ वर्षांवरील शेतकरी निवृत्त होवो अथवा न होववो त्याला पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. हे लक्षात घेऊन स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय सुरू करण्यात येणार आहे. मिशन मोडवर देशभरातील नद्या जोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे, असे श्री. मोदी म्हणाले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांनी पैसा भरला आहे. पण भरपाई देण्याच्यावेळी कंपन्या फसवणूक करीत आहेत. या कंपन्यांना पंतप्रधानांनी वठणीवर आणावे.  श्री. फडणवीस म्हणाले, की मराठवाड्याचे हक्काचे पाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पळविले. आम्ही हे हक्काचे पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटच्या शेतकऱ्याचा पैसा दिल्याशिवाय विमा कंपन्यांना सोडणार नाही, कर्ज दिल्यानंतर पाच वर्षे व्याज घेतले जाणार नाही. २१ हजार कोटींची कर्जमाफी करण्यात आली आहे. यात कोणीही वंचित राहणार नाही, तोपर्यंत ही कर्जमाफी योजना बंद केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com