आमच्या काळात एकही घोटाळा नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रचारसभेदरम्यान अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रचारसभेदरम्यान अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळातील घोटाळ्याने आपल्याला शरमेने मान खाली घालावी लागत होती. आमच्या काळात एकही घोटाळा नाही. काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर थेट वार केला, आपण पूर्ण बहुमत दिले. आम्ही देश शक्तिशाली केला, नवा देश घडवला, आज देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होऊ शकत नाही, असे सांगताना मजबूर नव्हे, तर मजबूत सरकारसाठी पुन्हा संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  

भाजप-शिवसेना महायुतीचे माढा आणि बारामती मतदारसंघातले उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ. कांचन कुल यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. १७) आयोजित अकलूज येथील सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले,  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, शिवाजी सावंत या वेळी व्यासपीठावर होते. 

श्री. मोदी म्हणाले, की बालाकोटच्या हल्ल्याने देशाला गर्व आहे. सरकारमध्ये दम असेल तर नेते नाही, तर जवांनाच्या गोळ्या बोलतात. ते मी करून दाखवले. २०१४ मध्ये जे सांगितले ते केले. मुंबई आतंकवाद्यासाठी स्वर्ग झाली होती. त्या वेळचे सरकार काहीच करत नव्हते. आता मात्र आम्ही हल्ला झाल्यास घरात घुसून मारतो, हे दाखवून दिले. पण जवानांच्या शौर्यावर काही जण संशय व्यक्त करत आहेत, याचे उत्तर तुम्हीच द्या. 

विरोधकांकडून खोटे आरोप केले जात आहेत. दिवसा स्वप्न बघणाऱ्यांना आणि खोटे बोलणाऱ्यांना मी थांबवू शकत नाही. पवार यांनी माझ्या परिवारावर बोलण्यास सुरवात केली. भारताची परिवार संस्कृती जगासाठी वैभवशाली आहे. पवार त्यांच्या संस्कारानुसार बोलतात, परिवार हीच माझी प्रेरणा आहे आणि संपूर्ण देश हाच माझा परिवार आहे, असेही मोदी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाला निधी देऊ, टाटाच्या धरणातील आतिरिक्त पाणी वापरात आणू, असे आश्‍वासन दिले.

विजयसिंह मोहिते पाटील यांची स्तुती खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील पहिल्यांदाच भाजपच्या मंचावर आले. त्यांचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विजयसिंह मोहिते पाटलांचा सन्मान करणे हे माझे भाग्य आहे.  सार्वजनिक जीवनात त्यांनी कुठल्याही पक्षात काम केलेले असो, त्यांचे काम मोठे आहे. त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयु लाभो आणि त्यांना देश आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची आणखी शक्ती लाभो, असे सांगत मोदी यांनी त्यांची स्तुती केली. 

...म्हणून शरदरावांनी माढ्याचे मैदान सोडले मोदी म्हणाले, की जे दिल्लीत बसले आहेत, त्यांना प्रत्यक्ष मैदानावरील स्थिती माहिती नाही. ही गर्दी त्या लोकांनी पाहावी, मग त्यांच्या लक्षात सत्य स्थिती येईल. मला आता लक्षात आले की शरदराव यांनी मैदान का सोडले. ते मोठे खेळाडू आहेत. ते वेळेआधी हवेचे रूप ओळखतात. दुसरे कुणी बळी गेले तरी चालेल, पण ते आपले नुकसान कधी होऊ देत नाहीत. त्यामुळेच ते मैदान सोडून पळाले, अशा शब्दांत मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.   मोदी म्हणाले...

  • साखरेवर शंभर टक्के आयात कर लावला, तर निर्यातीला प्रोत्साहन दिले.
  • शेतीमाल उत्पादक कंपन्या आणि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन दिले. 
  • पाण्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार. 
  • पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पाच एकराची अट हटविण्याबाबत विचार करणार.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com