सात मतदारसंघांत निवडणुकीच्या रिंगणात ११६ उमेदवार 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिल्या टप्प्यांतर्गत सात मतदारसंघांत उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या १४७ पैकी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

राज्यात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक चार टप्प्यांत घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम अशा सात मतदारसंघांत निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. या मुदतीत १४७ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली.

पहिल्या टप्प्यातील नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूरमधील चार तर भंडारा-गोंदियातील एका विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ दुपारी तीनवाजेपर्यंत असणार आहे. उपमुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. निवडणूक आयोगाने नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी सात ते दुपारी तीन अशी ठेवली आहे.

त्यानुसार ११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी तर भंडारा-गोंदियातील अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. उर्वरित ठिकाणी मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी बुलडाण्यामधून १५, अकोल्यातून १६, अमरावतीमधून ३७, हिंगोलीतून ४५, नांदेडमधून ५९, परभणीतून २८, बीडमधून ५९, उस्मानाबादमधून २३, लातूरमधून १५ तर सोलापूरमधून २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या १० मतदारसंघांतील उमेदवारांची संख्या ३२३ वर पोचली आहे. अर्ज माघारीनंतर या ठिकाणचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com