प्रचाराची सांगता; सतरा मतदारसंघात उद्या मतदान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील अंतिम टप्प्यातील निवडणूक प्रचार शनिवारी (ता. २७) संपला. प्रचार संपण्यापूर्वीच्या शेवटच्या काही तासांत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू होती. मतदारांच्या गाठीभेटी, पदयात्रा, रोड शोच्या माध्यमातून मतदारसंघ ढवळून काढण्यावर उमेदवारांचा भर दिसून आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री पुरुषोत्तम रूपानी यांनी ईशान्य मुंबईतील भाजपचे उमदेवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. भाजपने शेवटच्या तासात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले होते.  राज्यातील अंतिम टप्प्यातील १७ लोकसभा मतदारसंघांसाठी येत्या सोमवारी (ता. २९) मतदान होत आहे.

अंतिम टप्प्यातील मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत संयुक्त सभा घेतली. याशिवाय ठाकरे यांनी अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर आणि राहुल शेवाळे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ठिकठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुंबईकरांना संबोधित केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काळाचौकी आणि भांडुपमध्ये सभा घेऊन निवडणूक प्रचारात रंगत वाढवली. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे ओवेसी यांनीही प्रचार सभा घेतल्या. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरातमधील काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी मुंबईत येऊन प्रचार सभा घेतल्या आहेत.

सोमवारी मतदान होत असलेले मतदारसंघ  नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई वायव्य, मुंबई ईशान्य, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com