सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंना प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  ः सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एकूण २४ उमेदवारांपैकी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, पण मुख्यतः काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यातच खरा सामना होणार आहे. 

बसपचे राहुल सरवदे आणि प्रमोद बनसोडे यांनी माघार घेतल्याने ॲड. आंबेडकर यांच्यात होणारी मतविभागणी टळली आहे. तशी माहिती स्वतः या उमेदवारांनी देत माघार घेतली. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्याप्रमाणेच सोलापुरातून व्यंकटेश्‍वर महास्वामी अपक्ष म्हणून या निवडणुकीत आहेत. त्यांना ट्रॅक्‍टर चालविणारा शेतकरी हे चिन्ह मिळाले असून, त्यावर ते नशीब अजमावणार आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच जातीवर आधारित लढत होणार असल्याचे चित्र आहे. त्यातही ॲड. आंबेडकर यांच्यामुळे वातावरण पुरते बदलून गेले आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी आंबेडकर यांची उमेदवारी सर्वाधिक अडचणीची ठरली आहे. कारण एरव्ही शिंदे यांच्या हक्काची दलित, मुस्लिम मते आंबेडकर यांच्या पारड्यात पडणार आहेत, तर डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या लढतीतही लिंगायत समाजाची मते भाजपच्या पारड्यात जाणार आहेत, पण सर्वाधिक दलित आणि मुस्लिमांचे मतविभाजन होऊन त्याचा फटका शिंदेंना अधिक बसण्याची शक्‍यता आहे, पण ते आता प्रचारात कोणते मुद्दे उपस्थित करतात आणि त्यांची रणनिती कशी असणार, यावरच सगळे गणित आहे. गतवेळचा पराभव धुऊन काढण्यासाठी शिंदे प्रयत्नांची शर्त करत आहेत, तर पहिल्यांदाच या मतदारसंघातून लढत असल्याने आंबेडकर आपली सर्वस्वी ताकद लावत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com