राज्यात चार टप्प्यात सरासरी ६० टक्के मतदान

मतदानासाठी मतदारांची अशी रांग लागली होती
मतदानासाठी मतदारांची अशी रांग लागली होती

मुंबई : महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यांतील मतदान सोमवारी शांततेत पार पडले. अशा रितीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण झाला. शेवटच्या टप्प्यामध्ये १७ लोकसभा मतदरासंघांकरिता अंदाजे ५७ टक्के इतके मतदान झाले असून राज्यामध्ये चार टप्प्यात सरासरी ६०.६८ टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ९८ इतक्या मतदारांपैकी ५ कोटी ३७ लाख ४१ हजार २०४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

सन २०१४ च्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच राहिले असल्याचे अश्वनी कुमार यांनी सांगितले. मंत्रालयात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, आबासाहेब कवळे उपस्थित होते.

कुमार म्हणाले, पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील मतदारसंघ निहाय सायंकाळी ६ वाजेपर्यंतची अंदाजित मतदानाची टक्केवारी अशी – नंदुरबार - ६७.६४ टक्के, धुळे - ५७.२९ टक्के, दिंडोरी – ६४.२४ टक्के, नाशिक - ५५.४१ टक्के, पालघर - ६४.०९ टक्के, भिवंडी – ५३.६८ टक्के, कल्याण – ४४.२७ टक्के, ठाणे – ४९.९५ टक्के, मुंबई उत्तर – ५९.३२ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – ५४.७१ टक्के, मुंबई उत्तर पूर्व -५६.३१ टक्के, मुंबई उत्तर मध्य - ५२.८४ टक्के, मुंबई दक्षिण मध्य – ५५.३५ टक्के, मुंबई दक्षिण – ५२.१५ टक्के, मावळ – ५९.१२ टक्के, शिरुर -५९.५५ टक्के आणि शिर्डी – ६६.४२ टक्के. चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळेस ११६५ बीयू तर ७३२ सीयू आणि २ हजार ४६७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. आतापर्यंत सी व्हीजील ॲपवर ३ हजार ९९१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार २३१ तक्रारी योग्य असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सुमारे १ कोटी ९९ लाख हिटस् झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वाधिक मतदान- महाराष्ट्रात चारही टप्प्यात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये सांगताना कुमार म्हणाले की, कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मतदानाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहिले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ७१.९८ टक्के इतके मतदान झाले तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी ४४.२७ टक्के मतदान झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.

साडेआठ लाख कर्मचाऱ्यांचे हात राबले संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ७ लाख ४९ हजार ३७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे १ लाख ४ हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते. यावेळी राज्यामध्ये प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यासाठी एकूण १ लाख ८५ हजार ८५० (बीयू), १ लाख १७ हजार १३९ (सीयू) आणि १ लाख २३ हजार २०६ व्हीव्हीपॅट वापरण्यात आले.

१५७ कोटी किंमतीचा मुद्देमाल जप्त आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलिस यांनी एकूण रुपये ५३ कोटी आठ लाख रोख रक्कम, ७० कोटी १२ लाख किंमतीचे सोने, ३४ कोटी १५ लाख रकमेचे मद्य व मादक पदार्थ असे एकूण १५७ कोटी ५४ लाख रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यासंदर्भात १७ हजार ५८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com