‘शिर्डी’साठी ६२ टक्के मतदान

मतदानासाठी मतदारांची अशी रांग लागली होती
मतदानासाठी मतदारांची अशी रांग लागली होतीAgrowon

नगर : शिर्डी मतदारसंघासाठी सोमवारी (ता.२९) सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे ६२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह २० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद झाले आहे. २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीतून गुलालाचा धनी कोण, याचा निर्णय स्पष्ट होईल.

शिर्डी मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया एक हजार ७१० मतदान केंद्रांवर पार पडली. मतदारसंघात १५ लाख ८४ हजार ३०३ मतदारांचा समावेश आहे. यात आठ लाख २१ हजार ४०१ पुरुष, सात लाख ६२ हजार ८३२ महिला व इतर ७० मतदारांचा समावेश आहे. प्रक्रियेसाठी ११ हजार २८६ कर्मचारी आणि ३२१ वाहने नियुक्त केली होती. २०३० मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५.६० टक्के मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरवात झाली.

अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासे या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. मतदान केंद्रांवर १५९ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १७४ मतदान केंद्रांतून मतदानप्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध होती. मतदारसंघातील ९६३ अंध मतदारांना ब्रेल वोटर स्लिपचे वाटप झाले होते.

मतदारांच्या अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. उन्हाच्या कडाक्‍यातही मतदारांनी आपला हक्क बजावला. सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळी नऊ वाजेपर्यंत ८ टक्के, अकरा वाजेपर्यंत १८.३६ टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत ३८ टक्के, तर पाच वाजेपर्यंत ५५.६० टक्के मतदान झाले. मतदारसंघात अनेक भागांत तांत्रिक बिघाडामुळे मतदान यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. त्यामुळे प्रशासनाला मशिन बदलण्यासाठी धावपळ करावी लागली. मतदारांचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी सजावट करण्यात आली होती. मोबाईल घेऊन कोणालाही मतदान केंद्रात प्रवेश दिला जात नव्हता.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, दक्षिणेतील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, धनश्री विखे पाटील यांनी लोणीत मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संगमनेरमध्ये सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी सोनईत मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे मतदानाचा हक्क बजावला.

सध्या उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे दुपारी चारनंतर मतदानासाठी मतदार बाहेर पडले. दुपारपर्यंत तरी मतदान शांततेत पार पडले. संगमनेरमध्ये एका, तर नेवाशातील एका गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे अफवा पसवल्याप्रकरणी वाकचौरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

बहिरवाडी व धामोरीत मतदानावर बहिष्कार नेवासे : ‘आंदोलकांविरोधात पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मागे घ्या; अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू,’ या इशाऱ्याची प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत तालुक्‍यातील बहिरवाडी व धामोरी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, प्रशासनाने मध्यस्थीचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. या मतदान केंद्रात शुकशुकाट होता. तेथे सायंकाळपर्यंत मात्र १३८३ पैकी ५३ जणांचे मतदान झाले होते. बेलपांढरी शिवारात वीज खांबावर काम करत असताना वीजवाहक तारेला चिकटून नितीन राजेंद्र घोरपडे (वय २४, रा. बहिरवाडी, ता. नेवासे) या कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचे संतप्त नातेवाईक व बहिरवाडी ग्रामस्थांनी नेवासे पोलिस ठाणे व वीज उपकेंद्रात मृतदेह ठेवून आंदोलन केले होते. त्याबाबत पोलिसांनी सात आंदोलकांवर मृतदेहाची विटंबना व जमावबंदीचे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घेण्याची बहिरवाडी ग्रामस्थांची मागणी होती. गुन्हे मागे न घेतल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा लेखी इशारा बहिरवाडी व धामोरी ग्रामस्थांनी महसूल व पोलिस प्रशासनाला दिला होता.  पेमरेवाडीतही बहिष्कार संगमनेर ः पठार भागातील पेमरेवाडी (भोजदरी) या दुर्गम भागातील ग्रामस्थांनी मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार घातला. अकोले विधानसभा मतदारसंघातील पेमरेवाडी उंच डोंगरावर वसली आहे. येथे जाण्यासाठी रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अवघ्या १९१ मतदारसंख्या असलेल्या या छोट्याशा गावाच्या मूलभूत सुविधांसाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू आहेत. शिर्डी लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा फलकावर जाहीर केला होता. ग्रामस्थांची समजूत काढण्याचे प्रशासनाचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी येथे भेट देत, ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, ग्रामस्थांचा आश्‍वासनांवर विश्‍वास नसल्याचे चित्र समोर आले. मतदानाचा कालावधी संपेपर्यंत पेमरेवाडी येथील एकही ग्रामस्थ मतदान केंद्राकडे फिरकला नाही. त्यामुळे तेथे एकही मतदान झाले नसल्याच्या माहितीला सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

कोपरगावात ६२ टक्के मतदान कोपरगाव: शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ६१.८० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, सहायक अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली.

अनेक केंद्रांवर ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाल्याने सकाळी मतदानासाठी आलेल्या मतदारांना ताटकळत थांबावे लागले. त्यातून संबंधित अधिकारी, पोलिसांसोबत मतदारांची बाचाबाची झाली. मतदानासाठी मतदारांना ओळखपत्र आवश्‍यक होते. अनेकांनी स्लीप न आणल्यामुळे गोंधळ उडाला. मतदार यादीतील अस्पष्ट चेहरे व नावांमुळे अडचणी आल्या. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालय व तलाठी कार्यालय केंद्रात मतदान अधिकारी, पोलिस महिला व सूर्यतेज संस्थेने रांगोळ्या, शामियाना, फुग्यांची सजावट, सेल्फी पॉइंट तयार केले होते. उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेल्याने बहुतांश मतदारांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली. काही ठिकाणी रांगा लागल्याचे दिसले. महानुभाव विधी महाविद्यालय, एस. जी. विद्यालयातील केंद्रावर ‘ईव्हीएम’ बंद पडले होते. काही ठिकाणी अर्धा, तर काही ठिकाणी एक तासानंतर मतदान पुन्हा सुरू झाले.

शिर्डीत मतदान शांततेत शिर्डी ः शिर्डी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांना मोठे मताधिक्‍य मिळवून देण्यासाठी आज भाजपचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्व यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभी केली. डॉ. सुजय विखे पाटील सकाळी साडेसात वाजेपासून विविध गावांना भेटी देत होते. दरम्यान, शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान झाले.शिर्डी येथील साईनाथ माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी खासदार लोखंडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजाविला. ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील, डॉ. सुजय व त्यांच्या पत्नी धनश्री यांनी लोणी बुद्रुक येथील अहल्याबाई होळकर विद्यालयातील मतदान केंद्रात सकाळी साडेआठ वाजता मतदान केले. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आदर्श विद्यालयातील मतदान केंद्रात सकाळी साडेनऊ वाजता सपत्नीक मतदान केले. सखी मतदान केंद्रे, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, बालकांसाठी पाळणाघरे, तसेच काही केंद्रांत मतदान यंत्रांसाठी कुलरची व्यवस्था करण्यात आली होती.

राहुरी तालुक्‍यामध्ये मतदानाचा उत्साह राहुरी : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तालुक्‍यातील ३२ गावांमध्ये उत्साहात मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदार माघारी फिरले. ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह होता. स्वयंस्फूर्तीने मतदार घराबाहेर पडले. राहुरी फॅक्‍टरी, देवळाली प्रवरा येथे रणरणत्या उन्हात मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. दिव्यांग मतदारांना व्हीलचेअरवर बसवून केंद्रापर्यंत नेण्यासाठी स्वयंसेवकांनी मदत केली. काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रकार दिवसभर सुरू राहिल्याने मतदारांत नाराजी होती. यंत्रे बंद पडलेल्या काही ठिकाणी एक ते अडीच तासांपर्यंत मतदानप्रक्रिया बंद राहिली. त्यामुळे मोलमजुरी करणारे मतदार मतदान न करताच माघारी फिरले. काही ठिकाणी यंत्रे दुरुस्त करण्यात आली. काही ठिकाणी संपूर्ण सेट बदलण्यात आला. अतिउष्णतेमुळे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड होत असल्याचे एका केंद्रप्रमुखाने सांगितले. देवळाली प्रवरा येथील मतदान केंद्र क्रमांक २७७, २७८, २८०, २८३, २८४, २८९ व २९१ या केंद्रांवर, टाकळीमियाँ येथे ३०२ व ३०५, राहुरी फॅक्‍टरी येथील २९९ आणि खुडसरगाव येथील २४४ केंद्रावर ईव्हीएम बंद पडले होते. श्रीरामपुरात ६४ टक्के मतदान श्रीरामपूर ः शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी शहरासह तालुक्‍यात आज ६४ टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. गेल्या वेळी यापेक्षा एक टक्का अधिक मतदान झाले होते. तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेल्याने दुपारी अनेक मतदान केंद्रे ओस पडली होती. सकाळी व दुपारनंतर केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. तालुक्‍यातील ऐनतपूर, उक्कलगाव, उंदीरगाव, शिरसगाव, मालुंजे, गोंधवणी, रेव्हेन्यू कॉलनीसह अनेक केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने तेथे मतदानप्रक्रियेस विलंब झाला. उक्कलगाव, गोंधवणी व रेव्हेन्यू कॉलनीतील यंत्रे तक्रारीनंतर बदलण्यात आली. काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी गोंधवणी येथील प्राथमिक शाळेत मतदान केले. कांबळे यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, अविनाश आदिक यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत १८, दुपारी एक वाजेपर्यंत ३३, तर तीन वाजेपर्यंत ४७.२२ टक्के मतदान झाले होते. उष्णतेमुळे ४३ अंशांवर पारा गेल्याने दुपारी साधारण दोन तास मतदारांची संख्या रोडावली. सायंकाळी पुन्हा रांगा लागल्या. सहा वाजेनंतरही बेलापूरसह शहरातील काही केंद्रांवर रांगा लागलेल्या होत्या.

Stats
StatsAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com