लोकसहभागातून शेती, शिक्षणाला दिशा देणारी ‘लोकपर्याय’

tree plantation
tree plantation

निरंतर लोकसंवाद, महिला ग्रामसभा, प्रभावी कष्टकरी लोकसंघटनेच्या माध्यमातून औरंगाबाद येथील भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्थेने (लोकपर्याय) वेगळी ओळख तयार केली आहे. लोकसहभागातून ग्रामविकास, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेती विकास आणि जैवविविधता संवर्धनासाठी संस्था विविध उपक्रम राबविते.

भारतीय लोक व पर्यावरण विकास संस्था (लोकपर्याय) ही नोंदणीकृत संस्था सन २००२ पासून महिला, आदिवासी, दलित, भटके-विमुक्त, शेतकरी-शेतमजुरांची न्याय्य हक्कांसाठी कार्यरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, खुल्ताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. संस्था सामान्य कष्टकरी लोकसमूहांना शासनाच्या विविध कायदे- योजनांचा हक्क मिळवून देत आहे. संस्थेच्या उपक्रमात मंगल खिंवसरा, शांताराम पंदेरे सोडल्यास बाकी सारे स्थानिक स्त्री-पुरुष कार्यकर्ते त्याच लोकसमूहांतील तीन पिढ्यांपासून कार्यरत आहेत. एकनाथ बागूल, कांतिलाल मोरे, सुमनताई मोरे, रामदास, दोन्ही ज्ञानेश्वर, बाबूराव, हिराबाई, विठाबाई, धर्माभाऊ, रघुभाऊ, परसराम भाऊ, रवी गरुड, रवी मोरे, सयाजी,आदी आदिवासी, दलित, भटके-विमुक्त समूहांतील तरुण सहकारी कार्यरत आहेत. २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार “औरंगाबाद व्हिजन-२०२०”मध्ये आदिवासी-भटके-विमुक्तांवरील विषय लिहिण्यासाठी लोकपर्यायने सहकार्य केले. संस्थेतील सदस्य नियतकालिकांमध्ये समूहांच्या प्रश्नांवर सातत्याने लिखाण करतात.  संस्थेचा ‘वैजापूर पॅटर्न’ संस्थेच्या प्रयत्नांतून काही लोकसमूहांची मॉडेल्स उभी राहात आहेत. केवळ अति आदर्शवादात गुंतून न पडता वास्तवाचे पदोपदी भान ठेवत शासनाला ही लोकसमूहांची मॉडेल्स कशी स्वीकारायला लावायची हा संस्थेचा प्रयत्न असतो. उदा. जातीचे दाखले, शासन-प्रशासन-लोकप्रतिनिधी, पत्रकार, ग्रामपंचायत, लोकसमूह आणि संस्था यांचा परस्पर विश्वास, संवाद आणि सामूहिक कार्यपद्धतीनुसार योग्य कायद्यांची कालबद्धरीत्या अंमलबजावणी करता येते. हा नऊ तालुक्यांतील यशस्वी प्रयोग कोणत्याही विचारसरणीचे सरकार आले तरी हे अत्यावश्यकच आहे. संस्थेच्या प्रयत्नातून ‘वैजापूर पॅटर्न' पुढे आला आहे. महिला ग्रामसभा, आम ग्रामसभा, निरंतर लोकसंवाद, प्रभावी कष्टकरी लोक संघटन आणि कष्टकरी समूहांचे स्वत:चे नेतृत्व उभारण्यावर संस्थेचा भर आहे. लोकपर्याय संस्थेला महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार आणि अहिल्याबाई होळकर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. संस्थेचे विविध उपक्रम 

  • गेली ४१ वर्षे कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, आशा केंद्र, पुणतांबा आणि महाराष्ट्र जनुक कोष सोडून सारे उपक्रम-कार्यक्रम केवळ गावे आणि शहारांतील लोकांच्या संपुर्ण सहकार्यावर सुरू आहेत. 
  • संस्थेने सुमारे ३५ हजारांवर भिल, ठाकर, पारधी-आदिवासींना (वैजापूर, गंगापूर, खुल्ताबाद, कन्नड, पैठण हे पाच तालुके) त्यांच्याच गावामध्ये केवळ ८० ते २५० रुपयांत केवळ आठ ते पंधरा दिवसांत जातीचे दाखले मिळवून दिले.
  • नांदगाव (जि. नाशिक), वैजापूर, खुल्ताबाद, औरंगाबाद, फुलंब्री, औरंगाबाद, सिल्लोड, सोयगांव (जि. औरंगाबाद) या आठ तालुक्यांतील सुमारे ३५० भिल, पारधी, ठाकर-आदिवासी आणि १२०० वर बौद्ध, मातंग, चर्मकार, बंजारा, ख्रिश्चन भूमिहीन आदी कुटुंबांना सुमारे दोन हजार एकरांवर गायरान, पडीक जमीन व वन जमिनीचे हक्क मिळवून घेण्यात यश. या जमिनींवर नवरा-बायको किंवा एकट्या महिलेचे नाव लावून घेण्यात शंभर टक्के यश.
  • संस्थेतर्फे ७३ व्या घटना दुरुस्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने महिला ग्रामसभा घेण्यात येतात.
  • टीस आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या पाण्याच्या टाक्यांतून बावीस गावे, वाड्यावस्त्यांत दोन महिने लाखो लिटर शुद्ध पाणी पुरविण्यात येते.
  • शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या साहाय्याने ग्रामीण भागात महिला, बालकांसाठी खास आरोग्य शिबिरांचे आयोजन. गावकरी व आरोग्य केंद्र मिळून सर्व व्यवस्था केली जाते. लोकपर्याय फक्त लोकांना संघटित करते. 
  • हलक्या जमिनीवर शासनाच्या नरेगा, रोहयो व अन्य योजना राबविण्यात आल्या. यातील बरीचशी जमीन कसण्यायोग्य करण्यात आली. त्यामुळे शेकडो कुटुंबांना सन्मानजनक जीवन जगण्याचा मार्ग मोकळा झाला. परिणामी साधारणपणे ४५ टक्क्यांहून अधिक कुटुंबांतील स्थलांतराचे प्रमाण कमी झाले. परसबागेतील कुक्कुटपालनाला चालना.
  • आदिवासी मुलांच्या कुपोषणाचा अहवाल तयार करून तो औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना सादर. दैनिक सकाळने हा अहवाल प्रसिद्ध केल्याने त्यावर जिल्हा परिषद सीईओ यांनी कृती कार्यक्रम आखला. त्यातून सुमारे १६ मिनी अंगणवाड्यांसह मुख्य अंगणवाड्या सुरू करण्यात आल्या. यातील काही अंगणवाड्या आदिवासी वस्त्यांवर डोंगरात सुरू करण्यात आल्या आहेत.
  • शैक्षणिक उपक्रमांना चालना 

  • आठ ते नऊ महिने ऊस तोडणी, वाहतूक मजूर म्हणून निरंतर स्थलांतर करणाऱ्या आदिवासी, बंजारा, नंदी-बैलवाले, आदी भटके-विमुक्तांच्या कुटुंबांतील मुला,मुलींसाठी ‘बाल आनंद जीवन शाळा सुरू करण्यात आली. स्थलांतर करताना मुलांना त्यांच्या आई- वडिलांसोबत जाऊ न देता त्याच सरकारी शाळेत शिक्षण चालू ठेवून त्यांना शाळेतून परतल्यावर येथेच सांभाळले जात आहे. शहरी सहानुभूतीदार यांचा निधी, धान्य, शालेय साहित्य आदी शंभर टक्के सहकार्यातून मागील सहा वर्षे आनंद शाळा चालविली जाते.
  • दहावीनंतर आदिवासी मुला-मुलींना औरंगाबादमध्ये विविध महाविद्यालयांमध्ये वसतिगृहांसह प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत. 
  • आदिवासी मुला-मुलींना किमान बारावीपर्यंत शिकवा, हा पालकांकडे सातत्याने आग्रह. त्यामुळे आपोआप बालविवाह प्रमाण, पर्यायाने कुपोषण कमी होत आहे. 
  •   - शांताराम पंदेरे, ९४२१६६१८५७ (लेखक लोकपर्याय संस्थेत कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com