वऱ्हाडात बाजी कुणाची?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला ः  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला असून, राजकीय क्षेत्रात धाकधूक वाढली आहे. विजय कोणाचा होईल, याबाबत कुठलाही ठोस अंदाज व्यक्त होताना दिसत नाही. प्रामुख्याने बुलडाणा व वाशीम-यवतमाळ मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झालेली असून, उत्सुकता क्षणोक्षणी वाढत आहे. अकोल्याचा कौल हा भाजपच्या बाजूने मांडला जात आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय धोत्रे (भाजप), ॲड. प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी) आणि हिदायत पटेल (काँग्रेस) यांच्यात तिरंगी लढत झाली. या ठिकाणी मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात झाल्याचा फायदा पुन्हा एकदा संजय धोत्रे यांच्या बाजूने कौल देऊ शकतो, अशी शक्यता आहे. गेल्यावेळेपेक्षा त्यांच्या मतांचा लीड किती वाढतो, कमी होतो एवढेच गुरुवारी मतमोजणीतून स्पष्ट होईल, असा विश्वास भाजपकडून व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडी चमत्कार घडवू शकते, ॲड. आंबेडकर दिल्लीत जाऊ शकतात, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराबाबत मात्र तितकी खात्रीशीर गणिते कुणीही मांडताना दिसत नाही. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमाकांवर राहू शकतो. लढत ही धोत्रे आणि ॲड. आंबेडकर यांच्यात झाल्याचे बोलले जात आहेत.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघात या वेळी मोठी चुरस निर्माण झालेली आहे. शिवसेना-भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शेवटपर्यंत दमदार लढत दिली. शिंगणे यांच्याबाजूने अनेक नाराजांनी काम केले. शिवाय जाधव यांच्याप्रती असलेली नाराजी शिंगणे यांच्यासाठी फायद्याची ठरली. काँग्रेसनेही मदत केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवटपर्यंत सोबत होती. ही सर्व गणिते जुळून आली तर डॉ. शिंगणे बाजी मारू शकतात, असा विश्वास आघाडीचे समर्थक व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे जाधव यांचा विजय कुणीही हिरावू शकत नाही, असा आत्मविश्वास युतीच्या समर्थकांमध्ये आहे. या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार हे किती मते घेतात यावरही जाधव-शिंगणे यांचा जय-पराजय अवलंबून आहे. 

वाशीम- यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे अशी थेट लढत झाली. या दोघांमध्ये विजयाबाबत मोठी चुरस आहे. गवळी यांना यवतमाळ जिल्ह्यातून झालेला विरोध, वाशीम जिल्ह्यातही असलेली नाराजी कदाचित जड जाऊ शकते. तरीही त्यांचा सहजपणे पराभव होणे शक्य नसल्याचे जाणकार सांगत आहेत. माणिकराव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक तितकी सोपी नाही. भावना गवळी यांनी सातत्याने विजय मिळवलेला असून गावोगावी कार्यकर्त्यांची फळी तयार झालेली आहे. ही फळी निवडणुकीत कामाला येऊ शकते. ठाकरे यांना यवतमाळमधून लिड मिळाला तरी वाशीम जिल्ह्यातील किती मते मिळतात यावर बरेच काही अवलंबून आहे. 

वऱ्हाडातील लोकसभा मतदारसंघांचा विचार करता अकोला वगळता बुलडाणा व वाशीम-यवतमाळमध्ये चुरशीची लढत असून, तेथे निकालाची अधिक उत्सुकता ताणली गेली आहे. दुसरीकडे या निवडणुकीचे निकाल येत्या विधानसभा निवडणुकीची दिशा ठरविणारे असल्याने उमेदवारीसाठी इच्छुकांच्या आशा यावर टिकलेल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com