संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपने अापला उमेदवार जाहीर करीत अाघाडी घेतली. विद्यमान खासदार संजय धोत्रे यांना पक्षाने अकोल्यातून चौथ्यांदा उमेदवारी दिली अाहे. श्री. धोत्रे हे सोमवारी (ता. २५) उमेदवारी अर्ज दाखल करणार अाहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही. सोबतच बहुजन वंचित अाघाडीनेही अापले पत्ते उघडे केलेले नाहीत. अकोला लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला झालेला अाहे. खासदार धोत्रे यांनी मागील निवडणुकांमध्ये विरोधकांना एकतर्फी हरविले. या विजयात त्यांना मतदारांनी भरभरून देण्याची तत्कालीक वेगवेगळी कारणे होती. गेल्या वेळी तर ते मोदी यांच्या लाटेने तरले. या वेळी परिस्थिती तितकी सोपी राहलेली नाही. जातीय व इतर सर्व समीकरणे जुळून अाली तर काँग्रेस-अाघाडी किंवा बहुजन वंचित अाघाडीसुद्धा स्पधेत मुसंडी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोत्रे यांच्याबाबत वाशीम जिल्ह्यातील रिसोड या विधानसभा मतदारसंघात मोठी नाराजी अाहे. या मतदारसंघातील नागरिकांनी गेल्या १५ वर्षांत खासदार या भागात फारसे फिरकले नसल्याचे सांगितले. तसेच विकासकामांचीही बोंबाबोंब असल्याचा सूर सुरू केला अाहे. अशा प्रकारे अकोला जिल्ह्यातही ग्रामीण भागात फारसे उत्साही वातावरण नाही. विद्यमान खासदारांना गेल्या वेळप्रमाणे यंदा तितके पोषक वातावरण नाही.  खरी डोकेदुखी बहुजन वंचित अाघाडीची ठरू शकते. ॲड. प्रकाश आंबेडकरांचे होमटाऊन असलेल्या या मतदार संघात ते अठरापगड जातींची मोट बांधून रिंगणात येण्याची तयारी करीत अाहेत. तसेच काँग्रेसही नवीन चेहरा शोधत अाहे. काँग्रेसअाघाडी, वंचित अाघाडीचे उमेदवार योग्य पद्धतीने रिंगणात उतरविण्यात अाले तर चित्र बदलू शकते, अशी परिस्थिती अाहे. यामुळेच भाजपचा उमेदवार जाहीर होईपर्यंत विविध प्रकारच्या वावटळी उठल्या होत्या. उमेदवार बदलला जाईल, अशी शक्यताही बोलली जात होती. मात्र पक्षाने शेवटच्या क्षणी खासदार धोत्रे यांचे नाव यादीत जाहीर केल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला. अाता खरी लढत येत्या १८ एप्रिलला होणार अाहे. शेतीप्रश्नांवर शेतकऱ्यांची दोन्ही शासनांप्रती मोठी नाराजी अाहे. त्यामुळे धोत्रे यांचा अधिक कल शहरी, मध्यमवर्गीय मतदारांवर राहण्याची शक्यता अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com