सोलापूर बाजार समितीत भुसार-आडत व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील भुसार-आडत व्यापारी ग्राहकांच्या खिशाला सर्रास चाट लावत असून, कोणत्याही खरेदीवर ग्राहकांकडून असोसिएशन फंडाच्या नावाखाली ठराविक पैसे वसूल केले जात आहेत.
Looting of customers by Bhusar-Adat traders in Solapur market committee
Looting of customers by Bhusar-Adat traders in Solapur market committee

सोलापूर  ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील भुसार-आडत व्यापारी ग्राहकांच्या खिशाला सर्रास चाट लावत असून, कोणत्याही खरेदीवर ग्राहकांकडून असोसिएशन फंडाच्या नावाखाली ठराविक पैसे वसूल केले जात आहेत. याबाबत व्यापारी संघाकडे विचारणा करता त्यांना त्याबाबतचे नेमके उत्तर देता आले नाही. तर बाजार समितीच्या प्रशासनाने तर कानावर हात ठेवत जणू आम्हाला माहितच नाही, असा पवित्रा घेत टोलवाटोलवी केली.

सोलापूर बाजार समिती ही राज्यातील चौथ्या क्रमांकाची बाजार समिती गणली जाते. घाऊक बाजारपेठेचा आवाका मोठा असल्याने शेतकऱ्यांसह सामान्य ग्राहकही या बाजारात मोठ्या संख्येने खरेदी-विक्रीसाठी येतात. भुसार-आडत विभागात जवळपास ४५० हून अधिक व्यापारी आहेत. तर एका दिवसाची उलाढाल सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांपर्यंत आहे.

बाजार समितीच्या प्रशासनाकडे शेतमालाचे वजन, प्रतवारी यावरुन शेतकऱ्यांच्या सातत्याने तक्रारी असतातच. त्यावर प्रशासनाकडून फारशी दखल घेतली जात नाहीच. उलट इथले व्यापारी आता, तर ग्राहकांचीही असोसिएशन फंडच्या नावाखाली बिनधास्त आणि उघडपणे लूट करत आहेत.  

ग्राहकांकडून बाजार शुल्क, देखरेख शुल्क आकारणे आवश्‍यक आहे. पण याच पावतीवर व्यापाऱ्यांनी थेट असोसिएशन फंड नावाखाली प्रत्येक खरेदीमागे ठराविक रक्कम आकारत सर्रास लूट सुरु केली आहे. एवढेच नव्हे, त्यासाठी स्वतंत्र कॉलम पावतीवर प्रसिद्ध केला आहे. व्यापाऱ्यांच्या असोसिएशनला ग्राहकांनी का म्हणून पैसे द्यायचे, हा मूळ प्रश्‍न आहे. 

ग्राहकांच्या खिशाला अशा पद्धतीने काहीही संबंध नसताना व्यापारी कात्री मारत असताना आणि पावतीवर असे लिहिलेले असूनही बाजार समिती त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. व्यापाऱ्यांची संख्या आणि रोज ग्राहकांकडून वसूल होणाऱ्या पैशाचा विचार करता मोठी रक्कम वसूल होत असल्याचे दिसते. याबाबत बाजार समितीतील भुसार-आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभुलिंग विभुते यांना विचारता, त्यांनी थेट टोलवाटोलवी करत आपल्याला हा विषय माहितच नाही, असा पवित्रा घेतला. तसेच माहिती घेऊन सांगतो, असे उत्तर दिले. 

सचिवांचे अजब उत्तर

याबाबत बाजार समितीचे प्रभारी सचिव उमेश दळवी यांच्या निदर्शनास ही बाब आणली,  तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला पण काही माहिती नाही, माहिती घ्यावी लागेल. पण कोण व्यापारी आहे, नाव सांगा, माहिती घेतो, त्याबाबत चौकशी करु. कारवाई करु’’, असे उत्तर देत थेटपणे बोलण्यास टाळाटाळ केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com