वाराईतून शेतकऱ्यांची लूट

शेतकऱ्यांची होणारी लुट रोखण्यासाठी वाराई ही वजनानुसार आकारणी करावी, अशी मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडते असोसिएशनने बाजार समिती प्रशानाकडे केली आहे.
Looting of farmers from the wind
Looting of farmers from the wind

पुणे ः बाजार समित्यांमध्ये आवक झालेल्या शेतीमालाची वाहनांमध्ये केवळ फाळक्यापर्यंत आणून देणे, शेतीमाल वाहनांमध्ये लावणे या कामासाठीच्या ‘वाराई’मधून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची लूट वर्षानुवर्षे सुरू आहे. नियमानुसार वाराईचे दर ५० किलोला ३ रुपये ४५ पैसे तर ५० किलोच्या पुढील वजनाला ३ रुपये ८० पैसे असताना, मात्र प्रत्येक डागाला ५ ते १० रुपये अशी लूट सुरू असून, याद्वारे शेतकऱ्यांची होणारी लुट रोखण्यासाठी वाराई ही वजनानुसार आकारणी करावी, अशी मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आडते असोसिएशनने बाजार समिती प्रशानाकडे केली आहे.

बाजार समितीत शेतीमालाची आवक झाल्यावर हमाली, तोलाई, वाराई आदी विविध कामांसाठी नियमानुसार दर ठरविले आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वाराईची आकारणी ही वजनानुसार न होता, शेतीमालाच्या डागानुसार होत आहे. याचे मनमानी दर असून, हे दर ५ ते १० रुपये असल्याचे अडते असोसिएशनकडून सांगण्यात आले. ही आकारणी वजनानुसार करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. याबाबत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली विविध घटकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्व घटकांनी मते जाणून घेत, राज्यातील विविध बाजार समित्यांमधील वाराईचे दर आणि कार्यपद्धतींचा अवलंब कसा होतो. याची माहिती घेऊन, पुढील बैठक घेतली जाईल आणि त्यावर निर्णय होईल, असे बैठकीत ठरल्याचे समजते.

गेल्या २५ -३० वर्षांपासून वाराईची वसुली ही डागानुसार होत आहे. मात्र आता अडते असोसिएशन या पद्धतीला छेद देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रचलित पद्धतच सुरू ठेवावी. - संतोष नांगरे, सरचिटणीस, कामगार संघटना पुणे बाजार समिती

वाराईच्या दराबाबत गेली अनेक वर्षे सुधारणा झालेली नाही. अडते असोसिएशनचे म्हणणे आणि कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. नियमानुसारचे दर आणि सध्या घेतली जाणारी वाराई याबाबत चौथी पावती करण्याबाबत माथाडी बोर्डाला पत्र देणार आहोत. चौथ्या पावतीनुसार किती दर आकारला जातो हे निश्‍चित होईल. यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. - मधुकांत गरड, प्रशासक, पुणे बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com