हळद लागवड उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेत घटीची शक्यता

हळद लागवड उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेत घटीची शक्यता
हळद लागवड उशिरा झाल्यामुळे उत्पादकतेत घटीची शक्यता

हिंगोली ः हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांत यंदा वेळेवर पाऊस न झाल्यामुळे हळद लागवडीस उशीर झाला आहे. त्यामुळे हळदीच्या उत्पादकतेत घट येण्याची शक्यता आहे. पुरेशा पाण्याच्याअभावी अनेक गावांतील हळद लागवड अजूनही खोळंबलेली आहे.

यंदा हिंगोली जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर तर नांदेड जिल्ह्यात १४ हजार ५०० हेक्टरवर हळद लागवड प्रस्तावित आहे. परभणी जिल्ह्यात देखील हळदीचे क्षेत्र वाढत चालले आहे. परंतु, कृषी विभागाकडे  हळदीखालील क्षेत्राची माहिती नाही. परंतु, तीन ही जिल्ह्यातील हळदीचे एकूण क्षेत्र ५५ हजार हेक्टरवर पोचले आहे. गेल्या काही वर्षांत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने शेतकरी केळी, ऊस या पिकांच्या तुलनेत पाण्याची कमी गरज असलेल्या हळद पिकांकडे या तीन जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. गादीवाफा पद्धतीने लागवड केली जात असल्यामुळे हळदीची उत्पादकता वाढली आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार दरवर्षी साधारणतः २० मे नंतर हळद लागवडीस सुरवात होऊन १५ जूनपर्यंत संपते. या कालावधीत हळद लागवड झाल्यास किफायतशीर उत्पादन मिळते. परंतु, गतवर्षीच्या दुष्काळामुळे मे महिन्यात लागवड करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पाणी नव्हते. परंतु, पाणी उपलब्ध असलेल्या काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात लागवड केलेल्या हळदीची उगवण नीट झाली नाही.

तापमान जास्त असल्यामुळे बेणे सडून गेले. यंदा जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे हळद लागवडीस उशीर झाला. १५ जून नंतर बहुतांश भागात सुरू झालेली हळद लागवड अजूनही सुरू आहे. पुरेशा पाऊस नसल्यामुळे उगवणदेखील नीट होत नाही. पाण्याच्या उपलब्धतेवर हळद उत्पादनाचे भवितव्य अवलंबून आहे. परंतु, लागवडीस खूप उशीर झाल्यामुळे उत्पादनात घटीची शक्यता आहे.

गतवर्षी जूनमध्ये हळद लागवड झाली होती. परंतु, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात घट आली होती. यंदा हळद लागवडीस उशीर झाल्याने उत्पादन घटणार आहे. - बाळासाहेब राऊत, तेलगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com