मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसाय

दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही. आतबट्ट्याचा होत असलेला दुग्ध व्यवसाय पदरमोड करून करावा तरी किती काळ? असा प्रश्न मराठवाड्यातील दूध उत्पादकांनी उपस्थित केला आहे.
 losses dairy business in Marathwada
losses dairy business in Marathwada

औरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही. परंतु, अपवाद वगळता परवडणारे दर मिळत नसल्याची स्थिती मराठवाड्यातील उत्पादकांनी मांडली. त्यामुळे आतबट्ट्याचा होत असलेला दुग्ध व्यवसाय पदरमोड करून करावा तरी किती काळ? असा प्रश्न दूध उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

प्राप्‍त माहितीनुसार, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शासन, सहकार व खासगी दूध संस्थांद्वारे दर दिवशी जवळपास १० लाख लिटर दूध संकलन केले जाते. त्यामध्ये शासनाचे जवळपास ३६ हजार लिटर, सहकार संघांचे ३ लाख ४८ हजार लिटर, तर खासगी डेअरींचे जवळपास ६ लाख ३२ हजार लिटर संकलित होणाऱ्या दुधाचा समावेश आहे. त्यापैकी पॅकिंग व पदार्थ वापरासाठी जवळपास १ लाख लिटर, अनुदान योजनेअंतर्गत जवळपास २ लाख ७७ हजार लिटर, तर राज्याबाहेर जवळपास १ लाख लिटर दूध वापरले जाते. उर्वरित खासगी डेअरीचे दूध त्यांच्या सोयीनुसार उपयोगात आणले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासनाच्या नियमानुसार गाईच्या दुधासाठी २७ रुपये ५० पैसे, तर म्हशीच्या दुधाला ३४ रुपये प्रति लिटर दर दिला जातो. जो सहकारी संघांना निर्धारित तीन पाच, आठ पाचच्या फॅट- एसएनएफला उत्पादकाला देणे आवश्यक आहे. दुसरीकडे उत्पादकांना मात्र १५ ते २३ रुपये पर्यंतचे दर मिळत असल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दूध संकलनात घट आली नसली, तरी दर मात्र खर्चाला परवडत नसल्याचे उत्पादक सांगतात. 

ग्राहकांना चढ्या दरानेच दूध घ्यावे लागते. जनावराला दर दिवशी २०० ते ३२५ रुपये खर्च येतो. आधी पंधरवड्याला मिळणारे दुधाचे पेमेंट आता ४० ते ५० दिवस उलटूनही मिळत नाही. प्रतिक्रिया.. दररोज उत्पादित दूध डेरीला घालने सुरू आहे. आधी पंधरवड्याला मिळणारे दुधाचे पेमेंट आता महिन्यानंतरच मिळते. त्यातही खर्चाला परवडणारे दर मिळत नसतील, तर दुग्ध व्यवसाय टिकवावा कसा? - पूजा बोंद्रे, दूध उत्पादक,देवगाव ता. पैठण जि. औरंगाबाद

दर दिवशी शेकडो लिटर दूध घालतो. पण, दर १६ ते १९ रुपये प्रति लिटर पेक्षा जास्त मिळत नाहीत. पशुखाद्याचे दर आणि दुधाला मिळणारे दर याचा ताळमेळ बसेना. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आहे.  - गणेश जगदाळे, दूध उत्पादक,महाजनवाडी, जि. बीड

कडबा पन्नास रुपये पेंढी, पशुखाद्य २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल, उत्पादकाला दुधाचे दर मात्र कायम कमीच. या शिवाय दुधाचे पैसे वेळेत मिळण्याची अडचण. हा सगळा आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे.  - राजेंद्र तुरकणे, दूध उत्पादक,  लाखगंगा ता. वैजापूर, जि. औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com