कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा प्रसार

low cost vermicompost production technique
low cost vermicompost production technique

अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी खर्चात, सुलभ अशा छोट्या लोखंडी सयंत्राद्वारे गांडूळखतनिर्मिती केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी आपल्या संस्थेतर्फे अल्प किमतीत या सयंत्राचे वाटप केले आहे. शेतकरी, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी त्यांनी ही सयंत्रे देऊन कचरा व्यवस्थापनाचा संदेशही दिला आहे.    डोंगर पोखरायचा असेल तर अख्खी टेकडी हलवून चालत नाही. त्यासाठी एकेक दगड अन् खडा-गोटा काढून मार्ग निर्माण करावा लागतो. त्याचप्रमाणे समाजात मोठे काम उभे करायचे, तर लहान-लहान प्रश्नांपासून सुरुवात करावी लागते. अविरत प्रयत्न करून सचोटीने काम करावे, तेव्हा कुठे असे काम उभे राहते. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे वास्तव्यास असलेल्या शिवाजी खोगरे यांच्याबाबत हेच म्हणता येते. जयप्रभा ग्रामीण विकास मंडळ या संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी विविध उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. समाजसेवेची बीजे  बीड जिल्ह्यात कोरडवाहू केज तालुक्यातील वरपगाव येथील खोगरे यांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. सातवीच्या पुढे शिक्षणाची सोय, पुढे अन्य ठिकाणी शिकताना हॉस्टेलची फी भरणेही शक्य नव्हते. त्या कारणने बोर्डिंगमध्ये राहणे सोडावे लागले. तिथेच समाजसेवेची बीजे मनाच्या सकस भूमीत पेरली गेली. अंबेजोगाई येथील डॉ. द्वारकादास लोहिया यांचे ग्रामीण विकासाबाबतचे प्रयोग त्यांना कळलेले. त्यातूनच हातात दमडी नसताना खोगरे यांनी अंबेजोगाई गाठले. लोहिया यांच्या ओळखीतून हॉस्टेलवर राहून स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालयातून बी. कॉम. केले. पुढे लोहिया यांच्याच मानवलोक संस्थेत काम करीत समाजसेवेतील एमएसडब्ल्यूची पदवी घेतली. महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्यावरील पुस्तके वाचून, व्याख्याने ऐकून समाजसेवेची आवड आणखी पक्की झाली. त्यातूनच आपणही रचनात्मक काम केले पाहिजे, या प्रेरणेतून जयप्रकाश व प्रभादेवी यांच्या संयुक्त नावाने जयप्रभा ग्रामीण विकास मंडळाची स्थापना झाली. त्यातून ग्रामविकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले. पाणलोट क्षेत्र विकास, महिला सक्षमीकरण, सेंद्रिय शेती, वृक्ष लागवड, श्रमदान, स्वच्छता, वाचलनालय, माध्यमिक विद्यालय आदींमध्ये अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. सुमारे दोनशेपर्यंत खत युनिट वाटप   खोगरे यांनी सुमारे सव्वातीन बाय अडीच बाय दीड फूट आकाराच्या व कमी जाडीच्या लोखंडी अँगलपासून चौकोनी आकाराचे सयंत्र तयार केले आहे. त्याला जाळी लावण्यात आली आहे. आतील भागात शेडनेटचे अस्तर लावले आहे. त्यामध्ये साधारण एक क्विंटलपर्यंत खत मावते. हे सयंत्र तयार करायला त्या वेळी १३०० रुपये खर्च आला. मात्र, खोगरे यांनी ते केवळ २०० रुपयांना उपलब्ध करून दिले आहे.  अशी होते खतनिर्मिती  सयंत्राच्या अर्ध्या भागात कचरा टाकला जातो, तर उर्वरित अर्ध्या भागात शेण-मातीमिश्रित कुजलेले खत व त्यात प्रत्येकी अर्धा किलो गांडूळ कल्चर सोडण्यात येते. शेतकरी, शाळा, महाविद्यालये, नगरपरिषद, अंबेजोगाईतील नागरिकांना मिळूनआत्तापर्यंत सुमारे २०० पर्यंत सयंत्रांचे वाटप झाले आहे. त्यापासून मेथी, कोथिंबीर, आले, वांगी, भेंडी, कारली, दोडकी असा शेतमाल अनेकांनी घरच्या घरी पिकवला आहे. या प्रयोगामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी झाला आहे. अनेक जण स्वत:हून सयंत्राची मागणी करतात. सध्या नऊ वॉर्डमध्ये जागेवर कचरा कुजविण्यात येतो, तर गावाबाहेरच्या मुख्य डेपोतील मोठ्या शेडमध्ये अन्य सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलून त्याची विभागणी होते. जमिनीवर बेडच्या स्वरूपात खत तयार करण्यात येते. काही ठिकाणी जीवामृतही तयार करण्यात येते. अनेक शेतकरी या गांडूळखताचा वापर करू लागले आहेत. खतविक्रीबरोबर गांडूळ कल्चरचीही विक्री होत आहे. नगर परिषदेस पुरस्कार शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात अंबेजोगाई शहराने सहभाग नोंदविला. केंद्रीय पथकाने घर, वॉर्ड, डेपोस्तरावरील गांडूळ खतांचे व कचऱ्याच्या विल्हेवाटीचे प्रयोग पाहिले. त्या वेळी कमी खर्चात, फार मोठ्या यंत्रांचा वापर न करता पर्यावरणपूरक गांडूळखतनिर्मिती करण्यात आल्याची नोंद करण्यात आली. त्यातूनच राष्ट्रीय स्तरावरील सन २०१८-१९ चा पुरस्कार नगरपरिषदेस जाहीर झाला.  खोगरे यांनी अंबेजोगाई शहरात ही चळवळ यशस्वी करून दाखविली. त्यांचेच अनुकरण विविध गावांत, शहरांत निश्‍चितच होऊ शकते.  

गांडूळखतनिर्मिती प्रकल्प व प्रसार खोगरे यांनी सध्या गांडूळखतनिर्मिती प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून त्यापासून गांडूळखतनिर्मितीचे प्रयोग ते करीत आहेत. अंबेजोगाईसारख्या तालुकापातळीवरील शहरांतील कचरा व प्रदूषणावर केवळ चर्चा न करता नगरपालिकेला गांडूळखतनिर्मितीचा प्रस्ताव दिला. ऐंशी हजार लोकवस्तीमधून दररोज जमा होणाऱ्या १५ टन कचऱ्याचे शहराबाहेर डोंगर उभे राहत होते. त्यापुढे जाऊन कचरा संकलित करणारी यंत्रणा, मजूर, वाहने यावर लाखो रुपये खर्च होत होते. त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणे, मंडई आदी भागांतील कचरा जिथल्या तिथे त्या-त्या वॉर्डमध्ये कुजविण्यासाठी गांडूळखतनिर्मितीचे शेड उभारले. संपर्कः शिवाजी खोगरे, ८२७५००४५९० (लेखक लातूर येथील निवृत्त कृषी अधिकारी व शेती पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com