काजू उत्पादकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज 

कोकणाच्या शाश्‍वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्ध व्यवसायासह पर्यटनवाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे.
Low interest loans for cashew growers
Low interest loans for cashew growers

मुंबई : कोकणाच्या शाश्‍वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्ध व्यवसायासह पर्यटनवाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काजू उत्पादकांना अल्प व्याजदरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून व्याज दर सवलत योजना राबविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. 

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला कृषिमंत्री दादा भुसे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार शेखर निकम उपस्थित होते. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या मार्फत सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्याज सवलत योजना तयार करण्यात येणार आहे. तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर ओला काजूगर काढण्याच्या मिशन लुधियानावरून मागविण्यात येणार आहेत. या मशिन मागविल्यानंतर ओला काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसित करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. 

या बैठकीला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, राज्य उत्पादन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत (व्हीसीद्वारे), कुलसचिव डॉ. भरत साळवी (व्हीसीद्वारे), महाराष्ट्र स्टेट को-ऑप. कॅश्यु प्रो. फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय यादव, मिथिलेश देसाई, खालगाव काजू मद्यार्क व काजू उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक पंकज दळवी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com