नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र
‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच दक्षिण भारताच्या पूर्व भागात पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. उद्या (ता.२९) श्रीलंकेच्याजवळ हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.
पुणे: ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच दक्षिण भारताच्या पूर्व भागात पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. उद्या (ता.२९) श्रीलंकेच्याजवळ हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. भारताकडे ते सरकत असताना त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यात पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
नोव्हेंबर महिन्यात ‘गती’ आणि ‘निवार’ असे दोन चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. निवार हे चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून जमिनीवर येताच त्याची तिव्रता कमी झाली आहे. मात्र, या चक्रीवादळाचा फटका दोन्ही राज्यांना बसला. महाराष्ट्रातही त्याचा काही प्रमाणात परिणाम झाला असून राज्यातील अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीत चढउतार झाले होते.
आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दरम्यान, विषुवृत्ताजवळील हिंद महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. उद्या (रविवारी) या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता वाढत जाणार असून २ डिसेंबरच्या दरम्यान तमिळनाडू व पुद्दुचेरीच्या किनारपट्टीच्या जवळ धडकण्याची शक्यता आहे. वादळे निवळून अरबी समुद्राच्यादिशेने जात नाही, तोच पुन्हा बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात सतत निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीत चढउतार राहणार आहेत. तर अधूनमधून ढगाळ वातावरणाची स्थिती राहणार असून थंडीची काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
शुक्रवारी (ता.२७) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान. (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रुझ) २०.२, ठाणे २४.०, रत्नागिरी २१.०, डहाणू २०.५ (१), पुणे १४.१ (१), जळगाव १६.७ (४), कोल्हापूर १९.८ (३), महाबळेश्वर १४.२, मालेगाव १६.६ (४), नाशिक १३.४ (१), निफाड १२.०, सांगली १८.९ (३), सातारा १८.६ (४), सोलापूर १८.० (२), औरंगाबाद १८.४ (५),
बीड १५.९ (१), परभणी १६.४ (२), परभणी कृषी विद्यापीठ १६.४, नांदेड १९.५ (५), उस्मानाबाद १५.० (१), अकोला १७.९ (२), अमरावती १६.१ (-१), बुलडाणा १६.४, चंद्रपूर १९.४ (५), गोंदिया १६.४ (१), नागपूर १९.४ (५), वर्धा १९.० (४), यवतमाळ १५.५.