भुईमुगाच्या अल्प उत्पादनाने  शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले

भुईमुगाचे बोगस बियाणे व पोषक वातावरणाच्या अभावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याने पुसद तालुक्यातील भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा एकदा बिघडले आहे.
भुईमुगाच्या अल्प उत्पादनाने  शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले With low production of groundnut Farmers' finances deteriorated
भुईमुगाच्या अल्प उत्पादनाने  शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले With low production of groundnut Farmers' finances deteriorated

श्रीरामपूर, जि. यवतमाळ : भुईमुगाचे बोगस बियाणे व पोषक वातावरणाच्या अभावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नसल्याने पुसद तालुक्यातील भुईमुग उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण पुन्हा एकदा बिघडले आहे. 

खरीप व रब्बी हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुक्यातील नद्या, नाले, विहिरी व पुस धरण ही जलस्रोत पावसाळ्यात तुडुंब भरल्याने खरीप व रब्बीतील नुकसानाची भरून काढण्यासाठी उन्हाळी भुईमुगाची लागवड केली होती. परंतु मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही भुईमुगाच्या बोगस बियाण्याने दगा दिला असून, पिकाला अपेक्षित असलेले वातावरण नसल्यानेही भुईमूग उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक फटका बसला आहे.

श्रीरामपूर परिसरातील वालतूर रेल्वे येथील शेतकरी लक्ष्मण खंडाळे पाटील यांनी साडेतीन एकर भुईमुगासाठी मशागत खर्च १०,०००, बी-बियाणे व खत खर्च ४१,०००, फवारणी ८,०००, निंदण ७,०००, डवरणी २,०००, पाणी मजुरी ७,००० व काढणी मजुरी १५,००० असा एकूण नव्वद हजार रुपये खर्च केला आहे. सध्या भुईमुग उपटणे सुरू केल्यानंतर भुईमुगाला पाहिजे तशा शेंगा लगडल्या नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मजूर सुद्धा भुईमूग काढणीला येत नसल्याने काढणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तर मिळालेले मजूरही काढणीसाठी अव्वाच्या सव्वा दाम मागत आहेत. 

शेंगा बडवल्यानंतर एकरी अडीच ते तीन क्विंटलच उतारा येत आहे. शेतकऱ्याला साडेतीन एकरात केवळ दहा क्विंटल उत्पादन होईल, असे दिसून येत आहे. उत्पादन खर्च नव्वद हजार तर शेंगाचा दर पाच ते सहा हजार रुपये धरल्यास उत्पन्न केवळ साठ हजार होत असून, तीस हजार रुपयांचा तोटा सहन करावा, लागणार असल्याचे दिसून येत आहे. अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण भुईमूग उत्पादकांची झाली असून, निकृष्ट  असलेल्या बियाणे कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

खामगावमध्ये भुईमुगाची आवक वाढली खामगाव, जि. बुलडाणा : जिल्ह्यातील मोठी बाजार समिती असलेल्या खामगाव येथे भुईमुगाची आवक दररोज वाढत आहे. सध्या दर चार ते सहा हजारांदरम्यान प्रति क्विंटल मिळत आहे. आठवड्यातील दोन दिवस येथे भुईमुगाची खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत.

खामगाव कृषी उत्‍पन्न बाजार समितीमध्ये सोमवार ते गुरुवार धान्‍य तर शुक्रवार व शनिवारी भुईमुगाचे खरेदी विक्रीचे व्‍यवहार करण्यात येतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बाजार समिती प्रशासनाने कामकाजाचे नियोजन केले आहे. शुक्रवारी (ता. ७) व शनिवारी (ता. ८) केवळ भुईमूग खरेदी-विक्रीचे व्‍यवहार करण्यात आले.

या दोन दिवसांत ३ हजार ७२८ भुईमुगाचे पोते शेतकऱ्यांनी विक्रीस आणले होते. याला ४ हजार ते ६ हजार ४२० रुपये मिळाला. या बाजार समितीत जिल्‍ह्यासह अन्‍य जिल्‍ह्यातील शेतकरी शेतमाल विक्रीस आणतात. त्यामुळे बाजार समितीत शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापारी यांची गर्दी लक्षात घेता बाजार समितीने चार दिवस धान्‍य व दोन दिवस भुईमुगाच्या खरेदीचे नियोजन केले आहे. शेतकरी, अडते, खरेदीवर व अन्‍य लोकांची गर्दी होऊ  नये म्‍हणून बाजार समितीने निर्णय घेत सकाळी दहा वाजेपर्यंत  शेतकऱ्यांना प्रवेश दिला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com