जळगाव जिल्ह्यात कंपन्यांकडून खतांचा कमी पुरवठा

जळगाव जिल्ह्यात कंपन्यांकडून खतांचा कमी पुरवठा
जळगाव जिल्ह्यात कंपन्यांकडून खतांचा कमी पुरवठा

जळगाव : जिल्ह्यात रब्बी हंगामाला फटका बसल्याने खतांची अपेक्षित उचल झाली नाही. परिणामी, रब्बी हंगामात जिल्ह्यात विविध खतपुरवठादारांकडून आलेली सुमारे ४० हजार मेट्रिक टन विविध खते शिल्लक आहेत. यामुळे आगामी खरिपासाठीचा खतपुरवठा अपेक्षित गतीने सुरू झाला नसल्याची स्थिती आहे. 

खतांचा सर्वाधिक वापर करणारा भाग म्हणून जळगाव जिल्ह्याची राज्यात ओळख आहे. केळी, पूर्वहंगामी कापूस व भाजीपाला पिकांसाठी खतांची मोठी उचल केली जाते. आगामी खरिपासाठीदेखील खतांबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयारी केली आहे. खतपुरवठ्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खरिपासाठी तीन लाख ४० हजार मेट्रिक टन खतांचा पुरवठा लक्ष्यांक मंजूर झाला आहे. या खतांचा पुरवठा या महिन्यापासून सप्टेंबरपर्यंत होईल. सर्वाधिक पुरवठा जून व जुलैमध्ये करून घेण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खरिपात सुमारे एक लाख १५ हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा होईल. यापाठोपाठ फॉस्फेट, पोटॅश व संयुक्त खतांचा पुरवठा होईल. खरिपात खतांची मागणी जून व जुलैमध्ये असेल. शिल्लक खतांमध्ये युरिया, संयुक्त खते, फॉस्फेट अधिक प्रमाणात पडून आहेत. ही खते खत विक्रेते, गोदामे व कंपन्यांकडे आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती कृषी विभागाने संकलित केली आहे. 

‘ई-पॉस’द्वारे माहिती संकलित

ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल) यंत्रणेच्या मदतीने ही माहिती संकलित करणे सोपे झाले असून, नेमकी माहिती मिळाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे खतांची मागणी कमी होती. सध्याही खतांची उचल चोपडा, रावेर, यावल वगळता इतर भागात अपवादानेच आहे. शिल्लक खतांची विक्री झाल्यानंतर कंपन्यांना अनुदान मिळते. खते शिल्लक असल्याने पुन्हा नवीन पुरवठा करणे कंपन्यांसाठी वित्तीयदृष्ट्या परवडणारे नसल्याने अजून खरिपासंबंधीचा खतपुरवठा अपेक्षित गतीने सुरू नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com