पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाई

बारामतीच्या दुष्काळी भागात डिसेंबर अखेरपासून विहिरी कोरड्या पडून पाणीटंचाई भासण्यास सुरवात होते. या भागात जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे भुजल पातळीतही वाढ झाली आहे. एप्रिल उजाडूनही अनेक विहिरींमध्ये मुबलक पाणी आहे. यंदा टंचाई भासण्याची शक्यता कमी आहे. - मनोहर भापकर, सायंबाची वाडी, बारामती
 Low water scarcity this year in Pune region
Low water scarcity this year in Pune region

पुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस, दुष्काळी भागात झालेली जलसंधारणाची कामे, यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अद्यापही वाहत आहेत. त्यामुळे यंदा पुणे विभागातील पाणीटंचाई कमी असल्याचे चित्र आहे. गतवर्षी कोल्हापूर वगळता सर्वच जिल्ह्यांनी पाणीटंचाईच्या झळा सोसल्या. मात्र, यंदा केवळ सांगलीच्या जत तालुक्यात टंचाई असल्याने ३ गावे, १६ वाड्यांना ३ टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे, असे पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. 

२०१८ च्या मॉन्सून हंगामात पुरेसा पाऊस न पडल्याने भर पावळ्यातही पुणे आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणी टंचाई होती. त्यानंतर पाणीटंचाईत सातत्याने वाढ होत गेली. परिणामी, गतवर्षी उन्हाळ्यात (२०१९) पुणे विभागात टंचाईच्या झळा वाढल्या होत्या. पावसाचे उशीरा आगमन झाल्याने जून महिन्याच्या अखेरीस विभागातील तब्बल ९८७ गावे, ५७७० वाड्यांमध्ये ११९९ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. 

सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याच्या अनेक भागात टंचाई भासत होती. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात एकही टॅंकर सुरू करावा लागला नाही. गतवर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला विभागातील ४५३ गावे, ३ हजार १०२ वाड्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी ५१३ टॅंकर सुरू होते, असे राज्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट होते. 

मॉन्सूनमध्ये विभागात दमदार पाऊस पडला. धरणे ओसंडून वाहिली. त्यानंतरही पाऊस सुरच राहिल्याने विभागातील सर्वच नद्या पात्र सोडून वाहू लागल्या. अनेक प्रमुख नद्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरून अभुतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. विभागातील दुष्काळी भागातील नद्यांनाही अनेक वेळा पूर आले. यातच जलसंधारणाच्या कामांमुळे कायम टंचाईग्रस्त भागातील तलाव, ओढे, नाले तुडुंब भरले. भूजल व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमधील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. परिणामी, यंदा एप्रिल महिना उजाडूनही विभागात टंचाईच्या झळा कमी असल्याची स्थिती आहे. 

शनिवारपर्यंत (ता.४) सांगलीच्या जत तालुक्यातील ३ गावे १६ वाड्यांमधील ४ हजार ८४६ लोकसंख्येला ३ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील टॅंकर स्थिती 

जिल्हा २०१९ २०२०
पुणे ९४
सातारा १४० ० 
सांगली १३९ ३ 
सोलापूर १४० ० 
कोल्हापूर ० 
एकूण ५१३ ३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com