'माफसू'सह ‘अकोला’,‘कोकण’ कृषी विद्यापीठे ‘ब’ श्रेणीत

'माफसू'सह ‘अकोला’,‘कोकण’ कृषी विद्यापीठे ‘ब’ श्रेणीत
'माफसू'सह ‘अकोला’,‘कोकण’ कृषी विद्यापीठे ‘ब’ श्रेणीत

अकोला/नागपूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास भारतीय कृषी संशोधन परिषदेने ‘ब’ श्रेणी दिली आहे. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती आणि २.८५ गुण मिळाले आहेत.  काही महिन्यांपूर्वी विद्यापीठ तसेच विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांची तपासणी अधिस्वीकृती समितीने केले होते. या समितीची २९ मार्चला बैठक होऊन त्यात देशभरातील विविध विद्यापीठांच्या अधिस्वीकृतीवर बैठक झाली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ब श्रेणी मिळाली आहे.  या विद्यापीठाचे नागपूर येथील कृषी महाविद्यालयाला सर्वाधिक ३.१४ गुण मिळाले. गडचिरोलीच्या महाविद्यालयाला २.६८, यवतमाळ येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास २.७५ गुण मिळाले. अकोला येथील पदवीधर संस्थेला २.९७ तर येथील कृषी महाविद्यालयाने या मूल्यांकनात २.९४ गुण प्राप्त केले. याशिवाय अकोल्यातीलच कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीने ३.०९ गुण मिळवले. कॉलेज ऑफ हॉर्टीकल्चरला २.९९, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री २.८३ गुण मिळवण्यात पात्र ठरले.  या सर्व अभ्यासक्रमांना पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती मिळाली आहे. यापूर्वी झालेल्या मूल्यांकनाच्या वेळी समितीने पाच महाविद्यालयांना अधिस्वीकृती देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. तेव्हा मागील आठ वर्षांत पदभरती न केल्याने महाविद्यालयांमधील कारभार खिळखिळा झाल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र दरम्यानच्या काळात नवीन कुलगुरू आल्यानंतर त्यांनी अधिस्वीकृतीच्या अंगाने लक्ष घातले. उणिवा दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. गरज असलेल्या ठिकाणी नेमणुका करण्यात आल्या. अद्यापही मोठ्या संख्येने पदे रिक्त असली तरी शैक्षणिक कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. विविध उपक्रम राबविण्यास सुरवात करण्यात आलेली आहे. त्यामुळे या वेळी समितीने केलेल्या मूल्यांकनाच्या वेळी परिस्थिती बदलेली होती. समितीने भेट दिल्यानंतर तेव्हा समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. परिणामी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना अधिस्वीकृती मिळवण्यात यश आले. काही महाविद्यालयांना ३ पेक्षा अधिक गुण मिळाले. विद्यापीठाला मिळालेल्या ब श्रेणीमुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयांना उत्कृष्ट दर्जा मिळाला. सर्वांनी सांघिक कामगिरी केल्याने हे साध्य झाले. याचे सर्व श्रेय विद्यापीठाच्या प्रत्येक घटकाला जाते. सुवर्णमहोत्सवी वर्षात अशा प्रकारचे मानांकन मिळणे हे अधिक आनंददायी.  - डाॅ. व्ही. एम. भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला  

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठालाही ‘ब’ श्रेणी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला २.७७ गुण मिळाले असून ब श्रेणीत स्थान देण्यात आले. या विद्यापीठाला पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती मिळाली. मात्र या विद्यापीठाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या एमएस्सी (अॅग्रीकल्चर) अंतर्गत अॅनिमल हस्बन्ड्री, डेअरी सायन्स, एमएस्सी फ्रुट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरीकल्चर अँड लॅंडस्केपींग, प्लॅन्टेशन, स्पाईसेस, मेडिक्लीनल, अॅरोमेटीक क्रॉप, एमएस्सी फिशरी अंतर्गत फीश न्युट्रीशन अँड फीड टेक्नॉलॉजी, फिश इकॉनॉमिक्स तर याच विषयांना पीएचडीसाठी अधिस्वीकृती देण्यात आलेली नाही. या विद्यापीठाच्या दापोली येथील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरला २.७४, कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री ला २.५१, मुळदे येतील कॉलेज ऑफ हॉर्टीकल्चरला २.५९, दापोलीच्या कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी ला २.९०, रत्नागिरी येथील कॉलेज ऑफ फिशरीजला ३.२५ गुण मिळाले.  

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती आणि ‘ब’ श्रेणी मिळाल्याचा आनंद आहे. परंतु पुरेशा मनुष्यबळाअभावी फलोद्यानमधील काही विभागांना पीएच.डी.साठी अधिस्वीकृती मिळाली नाही. विद्यापीठाचे गुणांकन व श्रेणीवाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. - डॉ. एस. डी. सावंत, कुलगुरू,  डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

माफसूही ‘ब’ श्रेणीत नागपूर येथील माफसू विद्यापीठाने २.८८ गुण मिळवत ब श्रेणीत स्थान मिळवले आहे. याही विद्यापीठाला पाच वर्षांसाठी अधिस्वीकृती देण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांना चांगले स्थान मिळवता आलेले असले तरी परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेस या महाविद्यालयातील काही अभ्यासक्रमांना २.५ पेक्षा कमी गुण मिळाल्याने अधिस्वीकृती नाकारण्यात आली आहे. यामुळे या कॉलेजमधील हे विविध अभ्यासक्रम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.  नागपूर येथील कॉलेज ऑफ फिशरीजला २.५८, वरूड येथील कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजीला २.९०,  परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सला २.७७, उदगीरच्या कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सला २.८६, कॉलेज ऑफ फिशरीजला २.७९, डेअरी टेक्नॉलॉजीला २.७०,  नागपूर येथील व्हेटरनरी कॉलेजला ३.५१, माफसूच्या अकोला येथील व्हेटरनरी सायन्सला २.८६, शिरवळच्या केएनपी कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सला ३.०५, मुंबईच्या व्हेटरनरी कॉलेजला ३.५१ गुण मिळाले. ‘माफसूच्या सर्व कर्मचारी, अधिकारी, संशोधक अशा सर्वांच्याच सांघिक प्रयत्नांतूनच हे साध्य करता आले. यात कोणाचेही योगदान नाकारून चालणार नाही. माफसूला २.८८ इतके गुणांकन मिळाले असून, ते राज्यातील सर्वच विद्यापीठांपेक्षा अधिक आहेत.'' - डॉ. आशिश पातूरकर, कुलगुरू, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com