राज्यात ‘महा ॲग्रिटेक’ योजनेला सुरवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई  : पेरणी ते पीक काढणी या प्रत्येक टप्प्यावर पेरणी क्षेत्र, हवामान, पिकांवरील रोग अशा विविध बाबी डिजिटली ट्रॅक करून शेतकऱ्यांना माहिती देणाऱ्या देशातील पहिल्या ‘महा ॲग्रिटेक’ योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात केली. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर या उपक्रमात केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना वेळीच माहिती मिळून उपाययोजना करणे शक्य होणार आहे. ‘एमआरसॅक’ आणि ‘इस्रो’ यांच्या साह्याने राज्य शासन हा कार्यक्रम राबवणार आहे.

राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांनी  सोमवारी (ता.१४) राज्यभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतात विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून प्राप्त झालेल्या स्वावलंबनाच्या यशोगाथा शेतकऱ्यांनी या वेळी सांगितल्या. शेतीशी निगडित योजना ऑनलाइन केल्यामुळे गैरव्यवहारांना आळा बसला, पारदर्शकता आली, असे अनुभव शेतकऱ्यांनी या वेळी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जालना, पालघर, नगर, परभणी, वाशीम, गोंदिया, सोलापूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

‘महाॲग्री टेक’ कार्यक्रमाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमधील रब्बी हंगामातील पीक नियोजन, पीकनिहाय पेरणी क्षेत्र यासंदर्भात संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेतीक्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे. राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जाईल. उपग्रहाच्या मदतीने पीकनिहाय क्षेत्राचे मापन करताना पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत पिकांच्या वाढीचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

पीक काढणीनंतर उत्पादनाचे अनुमान काढण्यास मदत होणार असून, मुख्य म्हणजे शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी या तंत्रज्ञानामुळे मदत होणार आहे. हवामानातील बदलासह पिकांवरील कीड- रोगांबाबत वेळीच माहिती मिळणार असल्याने तातडीच्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे. शेतीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक शेतकरी डिजिटली ट्रॅक करणारा हा देशातील पहिला उपक्रम आहे. महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र (एमआरसॅक) व ‘इस्त्रो’ने या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी २०२२ पर्यंत शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे आमचे ध्येय निश्चित आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातील १६ हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. या योजनेमुळे ३४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. तर, पीक उत्पादनामध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेमुळे तर महाराष्ट्राचा कायापालट होत आहे. धरणातला गाळ काढून शेतात टाकल्याने पीक उत्पन्नासाठी कमालीचा फायदा होत आहे.

या वेळी शेतकऱ्यांनी शेततळ्यांमुळे उत्पादन वाढीस लागल्याचे सांगतानाच उन्हाळ्यातही पाणीटंचाई जाणवली नाही. जिथे पिण्यासाठी पाणी नव्हते तेथे आता ऊस, द्राक्षासारखी पिके घेतोय, असे सांगत बहुतांश शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजना वरदान ठरल्याचे सांगितले. सोलापूर येथील बिराजदार आजोबा आपल्या शेतात तयार केलेल्या शेततळ्याच्या काठी बसून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत होते. ‘साहेब, तळ्यातील पाण्याचे जलपूजन व्हायचे आहे, आपण रिमोटद्वारे बटन दाबून जलपूजन करावे,’ अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करताच रिमोटचे बटन दाबून मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन जलपूजन केले.

पालघर जिल्ह्यातील गणपत गावंडा यांनी अनुभव कथन करताना मुख्यमंत्र्यांना दुर्गम भागातील शेतीच्या सपाटीकरणाबाबत अडचण सांगितली. ती ऐकून ज्या भागात शेतीचे समतलीकरण करता येत नाही  तेथे अशी योजना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तातडीने विभागाला दिले.

गटशेतीला राज्य शासनाने चालना दिल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहे. पालघर येथे पाच हजार शेतकरी गट तयार झाल्याचे ऐकून मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. गटशेतीमुळे शेतकरी एकत्रित आल्यावर जी शक्ती निर्माण होते त्याचा फायदा मिळतो आणि एकरी उत्पन्नवाढीतही त्याचे लाभ मिळतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी गटांनी मेगा फूड पार्क योजना राबवावी. त्याला शासनातर्फे अनुदान दिले जाईल. नाशवंत मालावर प्रक्रिया केल्यावर त्याला भावदेखील चांगला मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

शेडनेटद्वारे पिकांचे उत्पादन, शेततळे, कृषी यांत्रिकीकरण, कर्जमाफी यांसह शेतमालाला बाजारभाव, फुलशेती, सेंद्रिय शेती यांसह विविध विषयांवर चर्चा झाली. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल केले. त्याचा फायदा राज्यातील अन्य शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

शेतीसाठी शाश्वत वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्यात लवकरच एक लाख सौर ऊर्जापंप वाटपास सुरुवात करण्यात येणार असून, शेतीला वीजपुरवठा करणारे सर्व फिडर सौरऊर्जेवर चालवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना आवडतो हातसडी तांदळाचा भात पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी आपल्या भागातील चिकू, नारळ, पपई, पेरू या फळांसोबतच विविध भाज्या आणि फुलांची माहिती देत होते. माझ्या घरी पालघर जिल्ह्यात पिकणारा हातसडीचा तांदूळ मी नेहमी आणतो. या तांदळाचा भात पौष्टिक असतो. तो मला आवडतो, असे कौतुकाचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढताच पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आनंद अवर्णनीय होता.

बीई, एमबीए झालेली तरुणी वळाली शेतीकडे  गोंदिया जिल्ह्यातील राणू रहांगडाले या तरुणीने बीई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतले आहे. एमबीएदेखील केले. मात्र, ती शेतीकडे वळली. आता सध्या ३५ एकर शेतीवरील भाजीपाल्यासह पपई, केळी यांचे उत्पादन घेते. स्ट्रॉबेरी पिकविते. यासाठी तिने सिंचन योजनांचा लाभ घेतला. शेती करताना शासनाच्या विविध योजनांमुळे कसा फायदा झाला याचे अनुभव सांगताना राणू रहांगडाले यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com