कृषी खात्याला दिशा देण्यासाठी ‘महाअॅग्रिटेक’

राज्यातील शेतकऱ्यांची आणि कृषी विभागातील मनुष्यबळाची उपयुक्तता यांची एकत्रित सांगड घालून ‘महाअॅग्रिटेक’ संकल्पना राबविली जाणार आहे. यात संगणकीय कामकाजाला व्यापक चालना देत प्रत्येक घटकावर ऑनलाइन तंत्रज्ञानाची मदत घेणे आणि कृषी खात्याच्या कामकाजात 'एन्ड टू एन्ड सोल्युशन' (सर्वसमावेशक उपाय) देणे अशी उद्दिष्टे आम्ही ठेवली आहेत. - एकनाथ डवले, कृषी सचिव
कृषी विभाग
कृषी विभाग

पुणे : कृषी खात्याच्या कामकाजाला दिशा देण्यासाठी ‘महाअॅग्रिटेक’ अभियान लागू करण्यात आले आहे. याचबरोबर मनुष्यबळ विकासाकरिता कृषी सहायकापासून ते संचालकांपर्यंत प्रकल्पाधारित कर्तव्य व जबाबदाऱ्यांचे वाटप व त्याचे वार्षिक मूल्यमापन करण्याची पद्धत लागू करण्याचादेखील निर्णय घेण्यात आलेला आहे.  राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याकडून कृषी खात्यामधील मरगळ झटण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. त्यासाठी कर्मचारी व अधिकारी वर्गाला विश्वासात घेऊन उपलब्ध मनुष्यबळचा जास्तीत जास्त वापर करण्याचे धोरण ठेवले जात आहे. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या माध्यमातून ‘कृषी खात्याला जास्तीत जास्त वेगवान व पारदर्शक’ करण्याकडे कृषी सचिवांचा कल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृषी सचिव व कृषी आयुक्त यांच्याकडून कामकाजातील सुधारणांचा आढावा घेतला जात आहे. विशेष म्हणजे आयुक्त व सचिवांकडून याबाबत अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठका होत असून, प्रत्येक मुद्दांवर बारकाईने काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. “सुधारणा करीत असताना टोकाची भूमिका घेणे, प्रचलित धोरणांना धक्का लावणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अविश्वासाची भावना दाखविणे हे टाळण्याचे प्रयत्न आहेत. गाजावाजा न करता शेतकरी वर्गाला उपयुक्त ठरणारी दिशा कृषी खात्याला दिली जाईल,” अशी माहिती एका उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.  सुधारणा करताना दीर्घकालीन, मध्यम मुदतीचे आणि येत्या खरिपासाठीचे असे तीन टप्पे केले जात आहेत. कृषी सचिवांनी अलीकडेच कृषी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पुण्यात घेतली. यात काही टप्प्यांबाबत नियोजन व भूमिका ऐकून घेतली. दीर्घकालीन उपायांबाबत मात्र माहिती घेण्याचे काम पुढेही चालूच राहणार आहे. भविष्यात विविध धोरणात्मक निर्णय घेताना सुधारणांचा नवा अजेंडा डोळ्यासमोर ठेवला जाणार आहे. अर्थात, हा अजेंडा अजून कुठेही लिखित स्वरूपात आलेला नाही.  

यशापयशाची जबाबदारी सचिवांचीदेखील  कृषी खात्यात धोरणात्मक चौकटीला पुढे नेताना केवळ कर्मचारी किंवा संचालक जबाबदार ठरत नाहीत. सचिव म्हणून मी देखील जबाबदार ठरतो. शेवटी कोणतेही कामकाज हे एकत्रित धोरणात्मक नियोजनाचे प्रतिबिंब असते. ते प्रतिबिंब चांगले असावे. कामाचे उद्दिष्ट, मूल्यमापन, मूल्यांकन शेवटच्या कर्मचाऱ्याचे व्हावे. कारण, जबाबदारी त्यांचीही आणि माझीही असते,” अशी भूमिका कृषी सचिवांनी घेतली आहे. कामकाजाला दिशा देताना स्वतःवर यशापशाची जबाबदारी घेण्याच्या सचिवांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे. मात्र, या भूमिकेतून ते प्रत्येक कर्मचाऱ्याला जबाबदारी आणि प्रामाणिकपणे वागण्याचा सल्ला देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

खरिपासाठी सुरू असलेले नियोजन

  • उत्पादनवाढ व योजनांसाठी कृती आराखडा बनविणे
  • राज्यात १२ हजार शेतीशाळा उघडणे 
  • दुष्काळात जलसंधारण कामांना महत्त्व 
  • फळबागा वाचविणे व नव्या लागवडीला चालना 
  • योजना वेगवान करण्यासाठी मध्यमकालीन उपाय

  •  उद्दिष्ट लादण्यापेक्षा जिल्ह्याची, तालुक्याची गरज पाहून नियोजन
  • कृषी विस्तारासाठी शेतकऱ्यांना प्रयोगशील शेतकऱ्यांमार्फत सल्ला
  • शेतीशाळा उपक्रमाचे ‘ॲम्बेसेडर’ म्हणून प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड 
  • गटशेतीसाठी ७२ कोटी रुपये दिले. अजून प्रोत्साहन व निधी देणार   
  • दीर्घकालीन सुधारणांमधील उद्दिष्टे

  • कृषी विभागाचे कामकाज ‘महाॲग्रिटेक’च्या जाळ्यात आणणे 
  • ऑनलाइन कामकाजातून ‘एन्‍ड टू एन्‍ड सोल्युशन’ देणे 
  •  कामकाजात ‘डिस्क्रिप्शन’ (वर्णनात्मक बाबी) ऐवजी ‘क्वॉलिटी’ला (गुणवत्ता) महत्त्व
  • गुणनियंत्रणाचे काम व्यक्तीच्या मर्जीप्रमाणे होण्याच्या प्रकारांना अटकाव 
  • तपासणीसाठी तंत्रप्रणालीकडून ‘रॅन्डम’ पद्धतीचा आधार घेणार 
  • कर्मचाऱ्यांचे काम ‘फ्रेमवर्क डॉक्युमेट’ व ‘की-एरिया’त आणून मूल्यमापन
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com