सोयाबीन बियाणे दरवाढीवरून ‘महाबीज’ प्रशासनाची कसरत

गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पुढील खरिपासाठी उपलब्ध होणाऱ्या बियाण्याचे दरसुद्धा यामुळे यंदा वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.
Mahabeez administration's exercise on soybean seed price hike
Mahabeez administration's exercise on soybean seed price hike

अकोला : गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने पुढील खरिपासाठी उपलब्ध होणाऱ्या बियाण्याचे दरसुद्धा यामुळे यंदा वाढण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. मात्र सोयाबीनचे बियाणे पुरवठा करणाऱ्या ‘महाबीज’ला कृषिमंत्र्यांनी बियाणे दरवाढ न करण्याची सूचना केल्याने या प्रशासनाला आता मोठी कसरत करावी लागणार आहे.

राज्यात सोयाबीनची लागवड गेल्या हंगामात ४३.५६ लाख हेक्टरपर्यंत पोहोचली होती. सोयाबीनला यंदा सातत्याने चांगला दर मिळाल्याने कल लागवडीकडे राहू शकतो. अशा स्थितीत बियाण्याची मागणी साहजिक अधिक होणार आहे. राज्यात लागणाऱ्या एकूण सोयाबीन बियाण्याच्या पुरवठ्यामध्ये महाबीजचा साधारणतः तीन लाख क्विंटलचा वाटा असतो. यानंतर उर्वरित बियाणे खासगी कंपन्यांकडून दिले जाते.

कंपन्यांच्या भूमिकेकडे लक्ष राज्यातील सोयाबीन बियाणे पुरवठ्यात महाबीज पाठोपाठ खासगी कंपन्यांची मोठी भूमिका राहते. या कंपन्या प्रामुख्याने मध्य प्रदेशातील आहेत. या कंपन्यांकडून वाशीम व इतर बाजार समित्यांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी बियाण्यासाठी झालेली आहे. आता महाग दराने घेतलेले सोयाबीन ते बियाणे म्हणून स्वस्त विकणार नाहीत. गेल्या हंगामात बियाणे न उगवल्यावरून राज्यात झालेल्या प्रकारांमुळेही या कंपन्या महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या पर्यायाच्या शोधात असल्याचे बोलले जाते. अशावेळी राज्यातील शेतकऱ्यांना लागणारे बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांना यंदा कसरत करण्याची चिन्हे आहेत.

महाबीज हे शासनाच्या अखत्यारीत असलेले महामंडळ असल्याने यावर नियंत्रण आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांनी गेल्याच आठवड्यात घेतलेल्या बैठकीत महाबीज प्रशासनाला यंदा बियाणे दरवाढ करू नका असे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे अधिकारी बोलत आहेत.

...अन्यथा नुकसान झेलावे लागणार ‘महाबीज’ हे आपल्या बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक दर देते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतूक, विक्रेत्यांची मार्जिन, इतर खर्च गृहीत धरून बियाण्याचे दर निश्‍चित केले जातात. मागील हंगामात सोयाबीन बियाण्याचा ७५ ते ८० रुपयांदरम्यान प्रतिकिलोचा दर होता. यंदा दर्जेदार सोयाबीन बाजारपेठेत पाच हजारांपर्यंत सर्रास विक्री झाले. शिवाय परतीच्या पावसाचा सोयाबीनच्या दर्जावरही परिणाम झाला होता. अशा स्थितीत चांगले सोयाबीन कमी दरात मिळणार नाही, हे निश्‍चित आहे. अशावेळी सोयाबीन बियाण्याचा दर हा गेल्या वर्षापेक्षा अधिक ठेवण्याशिवाय पर्यायच नाही. अन्यथा, नुकसान झेलत दर काढावे लागतील, असे एका जाणकार अधिकाऱ्याने सांगितले.

अनुदानाचा लाभही तितका नाही... शेतकऱ्यांना महाबीज बियाणे देताना शासन अनुदान देते. १५ वर्षांवरील आणि १० वर्षांआतील बियाण्याला वेगवेगळे अनुदान मिळते. शेतकऱ्यांची आजही मागणी जेएस ३३५ या वाणालाच अधिक असून हे वाण बरेच जुने आहे. त्यामुळे अनुदानाचा लाभ तितका मिळत नाही. अशा वेळी बियाणे किंमत न वाढविणे कितपत जुळेल याबाबत शंका व्यक्त होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com