महाबीज सव्वाचार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे देणार

महाबीज सव्वाचार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे देणार
महाबीज सव्वाचार लाख क्विंटल सोयाबीन बियाणे देणार

पुणे : राज्यात यंदा सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार नाही, असे महाबीजचे म्हणणे असून यंदा सव्वाचार लाख क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीन बियाणे महाबीजकडून विक्रीसाठी आणले जाईल.  सोयाबीन बियाण्याच्या बाजारपेठेत महाबीजची भूमिका मोलाची समजली जाते. महाबीजच्या किमती तसेच पुरवठा किती असेल याचा अंदाज घेऊन खासगी कंपन्यांकडून सोयाबीनच्या किमती ठरविल्या जातात. ‘‘राज्यात यंदा ३९ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. त्यासाठी महाबीजकडून चार लाख ३१ हजार क्विंटल बियाणे मिळणार आहे’’, अशी माहिती सूत्रांनी दिली.  महाबीजच्या तुलनेत खासगी कंपन्यांकडून यंदा सोयाबीन बियाण्याचा पुरवठा पाच लाख ५१ हजार क्विंटलच्या आसपास राहू शकतो. राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडूनदेखील अनुदानित किमतीत पाच हजार क्विंटलच्या आसपास बियाणे उपलब्ध होणार आहे.  राज्याच्या खरीप हंगामात मुख्यत्वे कपाशी, सोयबीन, ज्वारी, भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग ही मुख्य पिके घेतली जातात. यंदा खरिपाचे क्षेत्र १४६ लाख हेक्टरच्या आसपास राहील. प्रमुख पिकाचा विचार करता संपूर्ण राज्यासाठी १६ लाख २६ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. त्या तुलनेत महाबीजकडून ५ लाख ८१ हजार क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ ७२ हजार आणि खासगी कंपन्यांकडून १० लाख ११ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे.  बीटी कपाशीचा पेरा यंदा ४० लाख हेक्टरवर अपेक्षित धरला गेला आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, १५ मेपासून कपाशीच्या बियाण्याची विक्री राज्यभर सुरू होईल. शेतकऱ्यांकडून साधारणतः बीटी बियाण्यांच्या १६० पाकिटांची मागणी असते. त्यापैकी महाबीजकडून अवघ्या ८७ हजार पाकिटांचा पुरवठा होणार असून उर्वरित एक कोटी ६६ लाख पाकिटांची विक्री खासगी कंपन्यांकडून केली जाणार आहे.  बियाणे बदलाकडे लक्ष ठेवून राज्याची उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न कृषी विभाग करणार आहे. केंद्र शासनाने यंदा भात, तूर, मूग, उडीद, तीळ, सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा या स्वपरागीत पिकांसाठी बियाणे बदलाचा दर ३५ टक्के निश्चित केला आहे. बाजरी, मका, सूर्यफूल, करडई या परंपरागत पिकांसाठी हेच प्रमाण ४५ टक्के ठेवण्यात आलेले आहे.  संकरीत ज्वारी, भातासाठी मात्र बियाणे बदलाचे प्रमाण १०० टक्के ठेवण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाचे आहे. राज्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून भात अभियान यंदादेखील राबविले जाईल. मात्र, या आठ जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त इतर ९ जिल्ह्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ‘भात बियाणे साखळी विकास कार्यक्रम’ राबविला जाणार आहे.  भात उत्पादनात प्रसिद्ध असलेल्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, नगर आणि नंदूरबार या ९ जिल्ह्यांची भाताची उत्पादकता राज्याच्या उत्पादकतेपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांमधील भात उत्पादकता अजून वाढू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या भागांमध्ये भातानंतर दुसरे पीक घेतले जात नाही. भात बियाणे साखळी विकास कार्यक्रमामुळे या जिल्ह्याची उत्पादकता वाढविली जाणार असून, त्यासाठी भात प्रात्यक्षिकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. या उपक्रमात दापोली कृषी विद्यापीठ, महाबीज, कृषी विभाग, शेतकरी गट आणि भातगिरणीचालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.  खासगी कंपन्या १० लाख क्विंटल बियाणे विकणार 

पीक   अपेक्षित पेरा  महाबीजची अंदाजे बियाणे विक्री  खासगी कंपन्यांची अंदाजे विक्री 
संकरित ज्वारी   ४,५०,०००  १०,९३०   २५,१०५
सुधारित ज्वारी  ५०,०००    ०  १,३४०
संकरित बाजरी    ८,००,००० २०,०००   २३,६७५
सुधारित बाजरी ५७,००० १, ५१०  १००० 
भात  १६,००,०००   ७५,६३० १,४९,६७३
मका     ८,१६,०००  १२,०००  १,१२,०००
तूर    १६,००,०००    २,८००  ४२,०००
मूग  ५,३७,०००  २३,३९५      ४२,०००
उडीद   ४,५०,०००   १७,६२२   ४,५६८
भुईमूग    २,५० ,०००  १,५००   १,८००
सोयाबीन ३९,००,०००    ४,३१,०००     ५,५१,०००
बीटी कपाशी ४०,००,०००   ३९४    ७५,००,०००
सुधारित कपाशी     १,००,०००    ३००    ३,०५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com