पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव : महादेव जानकर

महादेव जानकर
महादेव जानकर

पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर पोल्ट्री व्यवसायाला मदतीचा हात देण्याकरिता सरकारी कोट्यातील धान्य वाजवी दरात उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी दिले. महाराष्ट्रातील लेअर  पोल्ट्रीधारकांनी मंगळवारी (ता. ३०) मुंबईत श्री. जानकर यांची भेट घेतली. ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. पोल्ट्रीधारकांच्या वतीने राष्ट्रीय अंडी समन्वय समितीचे पुणे विभाग अध्यक्ष श्याम भगत, शेती अभ्यासक दीपक चव्हाण आणि मालेगाव येथील पोल्ट्रीधारक शशिकांत तिसगे यांनी सध्याच्या संकटाबाबत अडचणी व संभाव्य उपाययोजना मांडल्या. आधीच दुष्काळामुळे घटलेले मका उत्पादन आता लष्करी अळीमुळे संकटात सापडले आहे. मागील सहा महिन्यांपासून अंडी व ब्रॉयलर उत्पादन खर्चात वाढ झाली असून, संपूर्ण व्यवसाय तोट्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर केंद्र - राज्य सरकारी कोट्यातील पशुआहारासाठी योग्य असे धान्य वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे. २००६ च्या बर्ड फ्लू संकटाच्या वेळी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले होते, तसेच ते या वेळीही करण्यात यावे. तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर शालेय पोषणात दैनंदित तत्त्वावर अंडी पुरवठा करण्यात यावा, आदी उपाययोजनांवर चर्चा झाली.  याप्रसंगी ज्येष्ठ पोल्ट्रीधारक राजू भोसले, प्रकाश बिरारी, संतोष पंजाबी, दिनेश हिरे, दादा माळी, एनईसीसी मुंबईचे अभय लाऊल, डॉ. लक्ष्मण तिसगे, विशाल ठाकूर, दिनेश मराळकर, शीतल सोनवणे यांच्यासह पुणे, नाशिक, धुळे येथील पोल्ट्रीधारक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com