महाएफपीसी ठरली ‘फूड हिरो’ 

महाएफपीसीने सार्वजनिक खासगी भागीदारीतून कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी केलेल्या कामाची विशेष नोंद घेत जागतिक अन्न संघटनेने घेतली आहे.
mahafpc
mahafpc

पुणे: महाएफपीसीने सार्वजनिक खासगी भागीदारीतून कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी केलेल्या कामाची विशेष नोंद घेत जागतिक अन्न संघटनेने घेतली आहे. महाएफपीसीचा ‘फूड हिरो’ सन्मान करण्यात आल्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. 

जागतिक अन्न संघटनेने (एफएओ) ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने जागतिक अन्नदिनाचे औचित्य साधून अन्न साखळीत मोलाचे काम करणाऱ्या घटकांचा शोध घेण्यात आला. या घटकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने ‘फूड हिरो’ म्हणून गौरविण्यात आले. यात काही व्यक्ती आणि महाएफपीसी सारख्या संस्थांचा समावेश आहे. नगरमधील उच्चशिक्षित शेतकरी योगेश थोरात यांच्या मेहनतीमधून ही संस्था तयार झाली आहे. 

महाएफपीसीने गेल्या तीन वर्षात शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी केली. दोन लाख कडधान्य, तेलबिया व कांदा उत्पादकांना मूल्यवर्धन साखळीमध्ये आणले आहे. त्यामुळे ‘एफएओ’ने ‘शाश्वत अन्न व्यवस्थेची उभारणी’ या विषयावर आयोजित केलेल्या दूरदृष्य परिसंवादात महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांना निमंत्रित केले होते. यावेळी थोरात म्हणाले की, “जागतिक अन्न कार्यक्रमाला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कृषी व अन्न क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटना अभिनंदनास पात्र ठरतात. आगामी काळात महाराष्ट्रातील किमान दहा लाख शेतकऱ्यांना पीकनिहाय मूल्यवर्धन साखळीत आणले जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सहकार्य मिळेल अशी आमची अपेक्षा आहे.” 

अन्न सुरक्षिततेबरोबरच पोषणतत्त्वांच्या दृष्टीने व्यवस्था बळकट करण्याबाबत कृती कार्यक्रम कसा असावा तसेच इतर धोरणात्मक बाबींवर यावेळी चर्चा झाली. ‘एफएओ’चे भारत प्रतिनिधी टोमिओ शिचिरी, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या संचालिका मीरा मिश्रा, जागतिक अन्न कार्यक्रमाचे प्रतिनिधी बिषाव पराजुली यांनी चर्चेत भाग घेतला. 

बिहारमध्ये मशरूम उत्पादनाचे समूह तयार करणाऱ्या अनिता देवी यांनाही ‘फूड हिरो’ने सन्मानित करण्यात आले आहे.

कार्याची दखल  महाएफपीसीने राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून थेट गावपातळीवरील शेतकरी उत्पादकांना बाजारपेठ कशी मिळेल तसेच ग्राहकांना देखील किफायतशीर भावात शेतमालाची उपलब्धता कशी होईल, याचे आदर्श प्रकल्प तयार केले आहेत. हमीभाव योजना, किंमत स्थिरीकरण योजनेत अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारलेले महाओनियन सारखे कृषी पायाभूत सुविधा उभारणी प्रकल्प कौतुकाला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळेच ‘एफएओ’ने या संस्थेला ‘फुड हिरो’ने सन्मानित केले आहे.  जागतिक अन्न संघटनेने ‘महाएफपीसी’ला ‘फूड हिरो’ने सन्मानित केल्याने राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना आनंद झाला आहे. शाश्वत शेती आणि पोषणमुल्यांबाबत राज्याच्या कोरडवाहू भागात या कंपन्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या चळवळीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना अजून वेगाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. - योगेश थोरात, व्यवस्थापकीय संचालक, महाएफपीसी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com