महाजन‘की`ने महापालिकेत सत्ता आणली

महाजन‘की`ने महापालिकेत सत्ता आणली
महाजन‘की`ने महापालिकेत सत्ता आणली

जळगाव : आदिवासी शेतकऱ्यांचे आंदोलन, दिल्ली येथील अण्णा हजारे यांचे उपोषण यासंबंधी यशस्वी मध्यस्थी करणारे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या एकखांबी नेतृत्वाने भाजपला प्रथमच महापालिकेत सत्ता मिळवून दिली आहे. माजी मंत्री सुरेश (दादा) जैन यांच्या सत्तारूपी किल्ल्याला नेस्तनाबूत करून महाजन ‘की`च चालल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. शिवाय येथील दादागिरी निष्प्रभ ठरली असून, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद  आणि आता महापालिकेच्या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागलेल्या दोन्ही काॅँग्रेस सैरभैर झाल्या आहेत.

जळगाव पालिका व सुरेश जैन हे समीकरणच होते. तत्कालीन नगरपालिका आणि २००३ मध्ये अस्तित्वात आलेली महापालिका ३५ वर्षे एकहाती जैन यांच्या हाती होती. जैन यांनी दोनदा पक्ष बदलले. तरीही जनतेने त्यांच्याकडे पालिकेची सत्ता सोपविली. एकनाथ खडसे यांनी सत्ता मिळविण्याचे केलेले प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. मागील पंचवार्षिकमध्ये भाजपचे फक्त १२ नगरसेवक होते. या निवडणुकीपासून खडसे काहीसे दूर राहिले. जैनांना रोखणे शक्‍य नसल्याचेच म्हटले जायचे. भाजप नेतृत्वाने महाजन यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे सोपविली. त्यांनी पक्षांतर्गत कुरबुरींचा सामना करत एकाकी धुरा सांभाळली. अशावेळी त्यांना आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ यांची खंबीर साथ मिळाली. 

एक वर्षात विकास करून दाखवू, असा नारा भाजपने दिला. नकारात्मक प्रचार व आरोपांऐवजी विकास, हाच मुद्दा प्रचारावेळी पुढे केला. याबरोबरच जातीय समीकरणे जुळवून माजी महापौर ललित कोल्हे, कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, चंद्रकांत कापसे आदींना आपल्या तंबूत आणले. मराठा, लेवा यांच्या मतांवर डोळा ठेऊन व्यूहरचना आखली. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील वगळता कुणीही प्रचारासाठी आले नाही.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर जैन हे प्रथमच या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले. भाजपचा विकास म्हणजे चुनावी जुमला, असा हल्ला जैन यांनी केला. राज्यमंत्री पाटील यांनी मोदींपासून मुख्यमंत्र्यांना आपल्या प्रचारात टीकेचे लक्ष्य केले. विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात सेना नेते अपयशी ठरले. काॅँग्रेस भाजपच्या नकारात्मक बाजू जनतेपर्यंत पोचवू शकली नाही. प्रदेशपातळीवरील नेत्यांनी लक्ष घातले नाही. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसेपाटील यांनी प्रयत्न केले, परंतु स्थानिक नेत्यांमधील अंतर्गत वाद कायम राहिले. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील हे ताकदवान उमेदवार देण्यास असमर्थ ठरले. दोन्ही काॅँग्रेसने आघाडी केली, पण जातीय समीकरणांवर कोणतेही काम केले नाही. सामर्थ्यवान उमेदवार नसल्याने त्यांना कुठेही यश मिळाले नसल्याचे म्हणता येईल.

जैन यांचे समर्थक अमर जैन यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच खडसे यांचे समर्थक सुनील माळी, अशोक लाडवंजारी हेदेखील अपयशी ठरले. मराठा मोर्चामुळे भाजपची अडचण वाढेल, असे चर्चिले जात होते. परंतु, भाजपचे जवळपास ८० टक्के मराठा उमेदवार विजयी झाले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनेही तीन जागांवर विजय मिळवित महापालिकेत प्रवेश केला. त्यांचा हा विजय सर्वांत लक्षवेधक ठरला असून, या पक्षाने दोन्ही काॅँग्रेसच्या विजयात अडथळे उभे केले.

 
 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com