फूल उत्पादकांची भिस्त आता दिवाळीवर

यंदा कोरोनामुळे लॅकडाउनच्या काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र दसऱ्याला काही प्रमाणात फूल विक्रीची संधी मिळाली. आता दिवाळीवरच शेतकऱ्यांची भिस्त आहे.
flower
flower

परतूर, जि. जालना ः यंदा कोरोनामुळे लॅकडाउनच्या काळात फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मात्र दसऱ्याला काही प्रमाणात फूल विक्रीची संधी मिळाली. आता दिवाळीवरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. दसऱ्याला मिळालेले दर टिकून राहतात का, यावर फूल उत्पादकांचे गणित अवलंबून राहणार आहे.  सध्या उत्सवबंदीमुळे फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदाच्या हंगामात फुलाला दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी गुंतवलेले पैसेही निघाले नाहीत. मार्च आणि जूनदरम्यान शेतकरी फूलशेतीस सुरुवात करतात. यातील बहुतांश शेतकरी पावसाच्या पाण्यावर म्हणजे जूनमध्ये पिकाची लागवड करतात. ऑगस्टपर्यंत पीक येण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा भागातील फूलपीक गणेशोत्सव काळात आले नाही. त्यामुळे बाहेरील राज्यातील मालाची आवक बाजारात होती. स्थानिक फुले सप्टेंबरच्या सुरुवातीला बाजारात आली.  यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अनेक शेतकऱ्यांचे शेतातील फूलपीक सडले. त्यामुळे त्यांनी पीक उपटून टाकले. मात्र, काही पीक शेतात आहे. उत्सव बंदीने तेही कसे विकावे, असा प्रश्न आहे. झेंडू, गुलाब, गॅलेडिया फुले घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. दिवाळी, दसऱ्याच्या दृष्टीने हे शेतकरी फूल पिकाचे नियोजन करतात. झेंडूच्या फुलांना मागणी नसल्यामुळे दरही पडले आहेत. तालुक्यात अनेक शेतकरी झेंडू, शेवंतीसह विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतात. गेल्या दहा वर्षांत पारंपरिक शेतीबरोबर ग्रीन हाऊस, पॉलिहाउस उभारून जरबेरा, गुलाबाचे उत्पादन घ्यायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यंदा गणेशोत्सव साजरा झाला नाही. देवस्थाने बंद असल्याने तिकडे फुले जात नाहीत. नवरात्रात, दसऱ्याला फुलांना चांगली मागणी असते. करोनामुळे तीही मागणी राहिली नाही. निदान दिवाळी सणाला फुलांना चांगला भाव येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

प्रतिक्रिया यंदा प्रारंभी फुलांनी शेतं बहरली होती. पण नंतर सतत कोसळणाऱ्या पावसाने दगा दिला. झाडांची मुळे कुजली. करोनामुळे मंदिरे बंद, उत्सवावर बंदी असल्याने उरल्यासुरलेल्या फुलांनाही मागणी आणि बाजारभाव राहिलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ २५ टक्के उत्पादन यंदा आहे. - मुकुंद खरात, शेतकरी, परतूर

पारंपरिक शेतीला फाटा देत फुलशेती करण्याचा निर्णय घेतला. त्यात मन लावून मेहनत केली. दिवाळीसाठी झेंडूची फुले तयार झाली आहेत. गुलाबाची फुलेही तयार आहेत. कोरोनानंतर दिवाळीला मार्केट चांगले मिळेल अशी अपेक्षा आहे. - सतीश राऊत, उस्मानपूर, ता. परतूर.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com