महाराष्ट्राच्या वाट्याला सात मंत्रिपदे

महाराष्ट्रातील सात शिलेदार दिल्लीच्या तख्तावर
महाराष्ट्रातील सात शिलेदार दिल्लीच्या तख्तावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळातील ५८ मंत्र्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल सात मंत्रिपदे आली आहेत. नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने एकही मंत्रिपद घेतले नाही. तो चर्चेचा विषय ठरला. अखेरपर्यंत सरकारमध्ये जाण्यास अनुत्सुक असल्याचे सांगितले जाणारे भाजपाध्यक्ष अमित शहा सरकारमध्ये आल्याने भाजप अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव व जे. पी. नड्डा यांच्या नावाची चर्चा आहे. रावसाहेब दानवे यांच्यासह तीन प्रदेशाध्यक्षांची केंद्रात बदली करण्यात आली असून. तशाच स्थितीतील हरियानातील दहापैकी तीन खासदारांना लॉटरी लागली आहे. माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्यासह मंत्रिमंडळात किमान १८ नवे चेहरे आहेत. मात्र, त्यातील बहुतांश राज्यमंत्री आहेत.  रावसाहेब दानवे, रामेश्‍वर तेली (बिहार) व महेंद्रनाथ पांडे (उत्तर प्रदेश) या तिघांना मोदींनी पुन्हा केंद्रात आणले आहे. महाआघाडीच्या आव्हानातही मोदींना ६२ जागा देणाऱ्या उत्तर प्रदेशातील सर्वाधिक नऊ खासदारांना मंत्री करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र सात, बिहार सहा, कर्नाटक व मध्य प्रदेश प्रत्येकी चार,  राजस्थान, पंजाब व गुजरात प्रत्येकी तीन, पश्‍चिम बंगाल व ओडिशा प्रत्येकी दोन, तमिळनाडू, तेलंगण, जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, केरळ, छत्तीसगड यांना प्रत्येकी  एकेक मंत्रिपद मिळाले आहे. राज्यातील दानवे यांच्यासह नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर हे जुने चेहरे असून संजय धोत्रे, शिवसेनेचे अरविंद सावंत, रामदास आठवले व पीयूष गोयल या सात चेहऱ्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. गोव्याचे एकमेव भाजप खासदार श्रीपाद येसो नाईक यांनी आपले स्थान राखले आहे. स्मृती इराणी मुंबईकर असल्या, तरी आता त्या अमेठीच्या खासदार आहेत. वगळलेल्या चेहऱ्यांत सुरेश प्रभू, महेश शर्मा, राधामोहनसिंह यांचा समावेश  आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या सात शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍यात परिचय. स्पष्टवक्ता व दिलखुलास व्यक्तिमत्त्व नितीन गडकरी एक यशस्वी शेतकरी आणि पूर्ती समूहाचे अध्यक्ष आहेत. विधानपरिषद सदस्य, नागपूरचे पालकमंत्री ते केंद्रीय वाहतूक व जहाजबांधणी मंत्री, अशी देदीप्यमान कारकीर्द आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. पहिले अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे होते. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि जवळपास ५५ उड्डाणपुल त्या काळात बांधले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य. पहिल्या मोदीपर्वातील सर्वांत प्रभावी मंत्री, रस्त्यांचे जाळे उभारण्याची किमया जनमत भाजपकडे टिकविण्यासाठी कामी आली. बॅंक कर्मचारी ते केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या समावेशाने पुण्याला केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळाली आहे. जावडेकर यांनी मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातही मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या, तसेच एक सामान्य बॅंक कर्मचारी म्हणून आयुष्याची सुरवात केलेल्या जावडेकर यांनी राज्यातही नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून १९९० ते २००२ या काळात ते आमदार होते. पदवीधरमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना पराभूत झाल्यानंतर पक्षाने २००३ मध्ये त्यांना केंद्रात प्रवक्तपदाची जबाबदारी दिली. गेल्या पाच वर्षांत संसदीय कामकाज, वन आणि पर्यावरण, माहिती आणि प्रसारण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी जावडेकर यांनी सांभाळली आहे. चार्टर्ड अकाउंटंट ते केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले. त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे भाजप आणि संघातील मोठे प्रस्थ होते. पीयूष गोयल यांनी आपल्या व्यवसायाला सुरवात केली ती इन्हेस्टमेंट बॅंकर्स म्हणून. ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. २०१६ मध्ये त्यांची भाजपचे राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली होती.२०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात खाण आणि कोळसा मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून समावेश झाला होता. त्यांनी मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमठविला. त्यानंतर त्यांना मंत्रिपदाची बढती मिळाली. सुरेश प्रभू यांचे रेल्वे मंत्रालय त्यांच्याकडे सोपविण्यात आले होते. तसेच अर्थमंत्री अरुण जेटली परदेशी उपचारासाठी गेले असताना त्यांनी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्पही मांडला होता. तळमळीचा मुंबईकर नेता अरविंद सावंत हे शिवसेनेच्या दुसऱ्या पिढीतला तळमळीचा मुंबईकर कार्यकर्ता. नोकरदारांमध्ये शिवसेना वाढली ती नोकरीत मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचे अस्त्र परजून.  महानगर टेलिफोन निगममध्ये सावंत यांचे मोठे काम. सुभाष देसाई यांच्याशी गोरेगाव परिसरातील कामामुळे जवळीक. त्याच आधाराने मातोश्रीच्या निकटवर्तीय वर्तुळात प्रवेश. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ फेररचनेनंतर शिवसेनेने भाजपकडून मागून घेतल्यानंतर कुणीही उमेदवार नसल्याने सावंत यांनी दक्षिण मुंबईत काम करावे, असे आदेश. मराठी माणसाशी अविरत संपर्क, मतदारसंघातील काम, यामुळे मिलिंद देवरा यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला हरवून दुसऱ्यांदा दक्षिण मुंबई राखली.  वीस वर्षांचा दांडगा अनुभव रावसाहेब दानवे हे एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले भारतीय जनता पक्षाचे नेते.  २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मते घेऊन पाचव्यांदा विजयी झाले आहेत. भाजपच्या गावशाखेच्या अध्यक्षापासून राजकीय प्रवेशाला प्रारंभ केला. दोन वेळा भोकरदनचे आमदार, पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. ते १९८० पासून सक्रिय राजकारणात आहेत. त्यांनी १९८५ मध्ये पहिल्यांदा भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढविली. पुन्हा १९९० मध्ये निवडणूक लढवून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. १९९५ मध्येही त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. १९९९ पासून  ते आजपर्यंत खासदार आहेत.  फायर ब्रॅंड नेते रामदास आठवले  :  अवघ्या चार दशकांपूर्वी दलित पॅंथरचे फायर ब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध असलेले व महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात प्रसिद्ध असलेले रामदास आठवले शिवसेना आणि भाजपच्या गोटात जाऊन बसले आहेत. दलित पॅंथरमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अरुण कांबळेंना सोबत घेऊन महाराष्ट्रातील काँग्रेसबरोबर राजकारण सुरू करून राज्यातील जातीय पक्षांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळेच १९९८ मध्ये मुंबई उत्तर मध्यसारख्या राखीव नसलेल्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही समाजकल्याण मंत्री म्हणून आठवलेंनी काम केले. काही काळानंतर त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.  अकोल्याचा भूमिपुत्र संजय धोत्रे :  केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्‍यांनी त्यांनी विजय मिळविला आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि ‘महाबीज’सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केले आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी सल्लागार समितीचे सदस्य, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीपदी वर्णी लागली. २०१८ मध्ये त्यांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. बी. ई. मेकॅनिकल पदवीधर असलेल्या धोत्रे यांनी एलएलबीचीही पदवी मिळविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com