महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू

महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू
महाशिवआघाडीत सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू

मुंबई ः राज्यात भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष आता एकत्रितरीत्या सत्ता स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्रित सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: तसे पुन्हा एकदा जाहीर केले आहे. आता हे तिन्ही पक्ष किमान समान कार्यक्रम निश्चित करीत असून, एकमेकांशी चर्चेच्या वाटाघाटी सुरू केल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे उपस्थित आहेत. तर शिवसेनेकडून स्वत: उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर चर्चा करत होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. 

काँग्रेससोबत बैठक झाली, चर्चा योग्य दिशेने सुरू आहे, निर्णय लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ठरले आहे की आधी आपली चर्चा करायची, त्यानंतर शिवसेनेशी चर्चा करायची. नव्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. तसेच किमान समान कार्यक्रम काय असावा हेसुद्धा आम्ही एकत्र बसून ठरवणार आहोत. उद्धव ठाकरेंसोबतच्या चर्चेत कशा पद्धतीने पुढे जायचे याबाबत बोलणे झाले आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा चर्चा होईल, आधी आम्ही आमचे ठरवू, त्यानंतर शिवसेनेशी चर्चा केली जाईल, असेही श्री. थोरात म्हणाले.

तर आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर एकवाक्यता होईल. महत्त्वाच्या पदांवर चर्चा होईल. अधिवेशनाआधी वरिष्ठांना राज्यातील चर्चा संपवायची आहे. त्यानंतर शिवसेनेबाबत चर्चा करण्याबाबत ठरवणार आहोत, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दुपारच्या सुमारासच लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्याआधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी श्री. राऊत यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. गेले काही दिवस जयपूरमध्ये मुक्काम ठोकून असलेले काँग्रेसचे सर्व आमदारही काल मुंबईत दाखल झाले.

समान कार्यक्रमासाठी समिती शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष सत्तेचा दावा करण्यापूर्वी किमान समान कार्यक्रम निश्चित करणार आहेत. तोच या नव्या आघाडीचा अजेंडा असणार आहे. त्यासाठी एक समिती नेमली जाणार असून, काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी पाच नेत्यांची नावे या समितीसाठी सूचवली आहेत. यात राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नवाब मलिक यांची नावे तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टावार, माणिकराव ठाकरे समितीत असण्याची शक्यता आहे. यात शिवसेनेच्या वतीने कोणकोण नेते असणार आहेत ते अजून स्पष्ट झालेले नाही. 

घोडेबाजाराला अजित पवारांचा उतारा ‘‘निवडणूक झाली त्या दिवसाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. सर्व आमदार आपापल्या पक्षासोबतच राहतील. कोणी काही करणार नाही. आम्ही एक ठरवलेले आहे. जर एखाद्या पक्षातील एखाद्या आमदाराने कुठल्या दबावाखाली वेगळी राजकीय भूमिका घेतली, तर पोटनिवडणुकीत आम्ही तिन्ही पक्ष एकच उमेदवार देऊ, मग कोण माय का लाल निवडून येतोय,’’ असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com