राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट

राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट

मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. ‘जलयुक्त’सारख्या जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ मध्ये महाराष्ट्राची सर्वोकृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. याचबरोबर विविध गटांतील दहा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले असल्याची घोषण केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने मंगळवारी केली. केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्याने जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या कामागिरीची नोंद घेतली आहे. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे महाराष्ट्रातील सुमारे १६ हजार गावे जल परिपूर्ण झाली आहेत. तसेच या कामांमुळे अनेक गावांतील भूजलपातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गेल्या वर्षात टँकरच्या संख्येतही घट झाली होती. राज्य शासनाच्या या कामाची दखल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये घेण्यात आली आहे. या पुरस्कारात सर्वोकृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे.  या यशाबद्दल आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित घटकांचे अभिनंदन केले आहे. फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे ठरले आहे. गेल्या चार वर्षांत प्रशासन व राज्यातील जनतेने मिळून केलेल्या कामाची पावती या पुरस्काराने मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांत कमी पर्जन्यमान असूनही जलयुक्त शिवारच्या कामांमुळे राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे. तसेच शेती उत्पादनातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शासकीय योजनेपेक्षा एक लोकचळवळ म्हणून राबविण्यात आलेल्या या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व गावे जलपरिपूर्ण करून टंचाईमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.  पुरस्काराबद्दल जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे म्हणाले, की राज्य शासनाने राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना सुरू केली. गेल्या चार वर्षांत या योजनेमध्ये सर्वोकृष्ट काम झाले आहे. या पुरस्काराने या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. शासनाबरोबरच नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे हे अभियान लोकचळवळ झाली. येत्या काही काळात संपूर्ण राज्यातील गावे ही जल परिपूर्ण करून टंचाईमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे.  जलसंधारण सचिव एकनाथ डवले म्हणाले, की जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, नदी पुनरुज्जीवन यासारख्या योजनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांच्या व शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पावले उचचली आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे शिवारातील पाणी शिवारातच मुरविल्यामुळे पाणीटंचाईवर मात करता आली. सीसीटी, नालाबंडिंग, नाला खोलीकरण यामुळे अनेक जुन्या स्रोतांचे पुनरुज्जीवन झाले.  इतर पुरस्कार असे आहेत

  •   सर्वोकृष्ट जिल्हा, भूजल पुनरुज्जीवन : प्रथम - अहमदनगर  
  •   नदी पुनरुत्थान : प्रथम क्रमांक- लातूर, द्वितीय क्रमांक - वर्धा
  •   जलस्रोताचे पुनरुत्थान : प्रथम क्रमांक - बीड
  •   सर्वोकृष्ट ग्राम पंचायत, प्रथम क्रमांक : महूद (बु), जि. सोलापूर
  •   जलसंधारण क्षेत्रातील सर्वोकृष्ट संशोधन, कल्पना व नवतंत्रज्ञानाचा वापर : तृतीय क्रमांक - सद्भावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा
  •   जलसंधारण कामाचा प्रसार करणारे सर्वोकृष्ट टीव्ही शो : 
  •     प्रथम क्रमांक - जनता दरबार, दूरदर्शन
  •   जलसंधारणामध्ये काम करणारी सर्वोकृष्ट शाळा : द्वितीय क्रमांक - एस. जी. गर्ल्स स्कूल, जाऊ, ता. निलंगा, जि. लातूर
  •   राज्यातील उत्कृष्ट वर्तमानपत्र (प्रादेशिक) : महाराष्ट्र सिंचन विकास, पुणे.
  •   उत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरण : प्रथम क्रमांक - महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com