एफआरपी वितरणात महाराष्ट्रच अव्वल

देशातील इतर राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची २० हजार कोटींची देणी थकविली असताना, महाराष्ट्राने मात्र आतापर्यंत १७ हजार कोटींपेक्षा जास्त ‘एफआरपी’चे वितरण करून आघाडी घेतली आहे.
Maharashtra tops in FRP distribution
Maharashtra tops in FRP distribution

पुणे : देशातील इतर राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची २० हजार कोटींची देणी थकविली असताना, महाराष्ट्राने मात्र आतापर्यंत १७ हजार कोटींपेक्षा जास्त ‘एफआरपी’चे वितरण करून आघाडी घेतली आहे.

देशभर साखर कारखान्यांनी यंदा एफआरपी (किफायतशीर आणि वाजवी मूल्य) मोठ्या प्रमाणात थकविली आहेत. महाराष्ट्रात मात्र साखर कारखान्यांनी आर्थिक संकटावर तोडगा काढत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘एफआरपी’च्या रकमा जमा करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले आहेत.

३१ मार्चअखेर राज्यात शेतकऱ्यांना १७ हजार ८५५ कोटी रुपये एफआरपीपोटी (रास्त व किफायतशीर दर) रुपये अदा करण्यात आले आहेत. १८८ कारखान्यांनी अदा केलेली ही रक्कम एकूण देय ‘एफआरपी’च्या ८८.७४ टक्के आहे. मात्र, थकीत रक्कम दोन हजार २६६  कोटी रुपये आहे. कारखान्यांनी ती देखील लवकरात लवकर द्यावी म्हणून साखर आयुक्तालयाकडून पाठपुरावा केला जात आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड सध्या प्रलंबित ‘एफआरपी’चा रोज आढावा घेत आहेत. कारखान्यांच्या आर्थिक अडचणी विचारात घेत शक्य तेथे जप्तीच्या नोटिसा बजावून प्रलंबित एफआरपीचा मुद्दा सोडविण्याकडे आयुक्तालयाचा कल आहे.

आयुक्तांनी पहिल्या टप्पात १३ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा काढल्या. त्यानंतर पुन्हा पाच कारखान्यांना नोटिसा बजावल्याने आता कारवाईच्या जाळ्यात आलेल्या कारखान्यांची संख्या १७ पर्यंत गेली आहे.

माझा यावर्षी दहा एकर ऊस होता. मुळा कारखान्याने यंदाही दरवर्षी प्रमाणे मला शंभर टक्के एफआरपीनुसार पेमेंट केले आहे. - लक्ष्मण बर्डे, मक्तापुर, ता. नेवासा जि. नगर

यंदा कोरोना काळात ही उसाची एफआरपी वेळेत मिळाली याचा मोठा आनंद आम्हाला आहे. आमचा ऊस दत्त कारखान्याला गेला आहे. या सर्व उसाची एफआरपी आमच्या खात्यावर जमा झाली आहे. वेळेत पैसे मिळाल्याने आमची आर्थिक चणचण दूर झाली. - शरद गोधडे, चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

देशातील साखर कारखान्यांची यंदाची प्रलंबित एफआरपी २० हजार कोटींच्या आसपास पोचली आहे. त्यात एकट्या उत्तर प्रदेशाचा थकीत रकमेचा आकडा १२ हजार कोटींचा आहे. महाराष्ट्रातील १८८ कारखान्यांनी त्या तुलनेत शेतकऱ्यांना आतापर्यंत १७ हजार ८६९ कोटी रुपये एफआरपीपोटी वाटले आहेत. आता सव्वा दोन हजार कोटीच्या रकमा थकीत आहेत. - शेखर गायकवाड, साखर आयुक्त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com