विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र प्रतिसाद 

विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत पॅनेलला संमिश्र यश मिळाले आहे. दोन्ही पक्षासाठी ही दिलासादायक बाब असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गोंदिया जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींवर चार उमेदवार निवडून आणत सर्वांना सुखद धक्का दिला आहे.
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र प्रतिसाद Mahavikas Aghadi in Vidarbha, mixed response to BJP
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र प्रतिसाद Mahavikas Aghadi in Vidarbha, mixed response to BJP

नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत पॅनेलला संमिश्र यश मिळाले आहे. दोन्ही पक्षासाठी ही दिलासादायक बाब असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गोंदिया जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींवर चार उमेदवार निवडून आणत सर्वांना सुखद धक्का दिला आहे. मनसेच्या या यशाबद्दल सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. 

गोंदिया जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. हेवीवेट नेते प्रफुल पटेल या भागाचे नेतृत्व करतात, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने केलेला चंचू प्रवेश अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.

गोंदिया तालुक्यातील फुलचूर ग्रामपंचायतीवर मनसे जिल्हा उपाध्यक्ष मोजल रामटेककर, देवणी तालुक्यातील भर्रेगाव येथे जयेंद्र मेंढे, संगीता तर्रो, सालेकसा तालुक्यातील पाउलदवणा ग्रामपंचायतीवर संजीव पटले विजयी झाले. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींवर भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी संमिश्र यश मिळविले आहे.

भाजपचे माजी आमदार विनोद अग्रवाल यांची जादू देखील कायम असल्याचे निकालावरून सिद्ध झाले. यवतमाळ जिल्ह्यात सोळा तालुके आहेत. सर्वाधिक लढती या जिल्ह्यात झाल्या. तब्बल ९२५ ग्रामपंचायतीं करता मतदान पार पडले. यातील दारव्हा, नेर, दिग्रस तालुक्यात शिवसेनेला कौल मिळाला आहे.

यवतमाळ तालुक्यात भाजपची सरशी ठरली. नागपूर जिल्ह्यात १२७ ग्रामपंचायतींकरिता मतदान झाले. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महाविकासआघाडी प्रणीत पॅनेलच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. काही तालुक्यांमध्ये भाजपने देखील सत्ता हाती घेतली आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे मूळ गाव असलेल्या पाटणसावंगी येथे केदार पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोल तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. वर्धा जिल्ह्यात पन्नास ग्रामपंचायतीं करता मतदान झाले होते. यातील सर्वाधिक १७ ग्रामपंचायती एकट्या समुद्रपूर तालुक्यात आहेत. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक उमेदवारांनी यश संपादन केले. कारंजा घाडगे, आष्टी तालुक्यात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

कधीकाळी भाजपच्या आमदारांमुळे भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यात यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. अमरावती जिल्ह्यात ५३७ ग्रामपंचायतींकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर महाविकासआघाडी प्रणीत पॅनेलच्या उमेदवारांनी यश मिळविले.

मोर्शी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींवर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांच्या नेतृत्वातील पॅनेलने विजय मिळविला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारांनी जल्लोष न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्ष करीत अनेक उमेदवारांनी विजय रॅली काढली.  गडचिरोलीत शुक्रवारी मतमोजणी  नक्षलप्रवण आणि संवेदनशील असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींकरता दोन टप्प्यांत मतदान घेतले जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात शुक्रवारी (ता.१५) मतदान पार पडले. १७० ग्रामपंचायतीं करता मतदान झाले. उर्वरित ग्रामपंचायत करिता बुधवारी (ता. २०) मतदान होणार आहे. या दोन्ही टप्प्यातील मतमोजणी शुक्रवारी (ता. २२) होईल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com