महाविकास आघाडी तरी सांगलीतील योजना मार्गी लावेल? 

Mahavikas aghadi will solve sangli district in issues
Mahavikas aghadi will solve sangli district in issues

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय पाटील व तत्कालीन आमदार विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेपासून वंचित ६४ गावांसाठी विस्तारित योजना आखली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मंजुरी दिली, असे सांगण्यात आले. मात्र, पुन्हा योजनेला लवादानुसार पाणी देता येत नसल्याचे खुद्द जलसंपदामंत्र्यांनी स्पष्ट केले. नव्याने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या काळात ती योजना मार्गी लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नवे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या खांद्यावर दुष्काळी जनतेच्या अपेक्षांचे ओझे आहे. शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले विस्तारित योजनेचे भिजत पडलेले घोंगडे ते सोडवतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्यात मोठा व कायमस्वरूपी दुष्काळी तालुका जत आहे. वार्षिक पर्जन्यमान कमी आहे. पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. तालुक्‍याला कृष्णा नदीच्या पाण्यावरील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेवर अवलंबून राहावे लागते. दरवर्षी उन्हाळ्यात गंभीर स्थिती असते. सरकार दर वर्षी पाण्याचे टॅंकर व चारा छावण्या सुरू करते. टॅंकर व चारा छावण्यांवर ५०-६० कोटींचा निधी खर्च करावा लागतो. जत तालुक्‍यासाठी राबवण्यात आलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात आहे. 

६४ गावांसाठी उपयुक्त योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. कामे प्रगतिपथावरर आहेत. म्हैसाळ सहावा टप्पा प्रकल्पासाठी ४.८१ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आले. विस्ताराने मोठा असलेला तालुका पूर्णतः सिंचनाखाली येऊ शकत नाही. म्हैसाळ मूळ योजनेपासून वंचित असणारी ४७ गावे व अंशतः वंचित १७ अशा गावांसाठी सरकारकडे विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी आहे.

६० हजार एकर क्षेत्राला फायदा होणार आहे. ६५० कोटींची गरज आहे. १७५ किलोमीटर बंदिस्त नलिकेतून पाणी मिळणार आहे. भूसंपादनाची आवश्‍यकताही भासणार नाही. म्हैसाळ टप्पा क्रमांक तीनमधून हे पाणी उचलण्यात येणार आहे. पाच टीएमसी अतिरिक्त पाणी आवश्‍यक आहे. 

टप्पा क्रमांक तीनमधील बेडग (ता. मिरज) येथून कोकळे (ता. कवठेमंकाळ) त्यानंतर जत तालुक्‍यातील मिरवाड तलाव, अशा तीन टप्प्यात पाणी उचलून ते ६४ गावांना दिले जाणार आहे. पश्‍चिम भागातील वाषान सर्वांत उंच ठिकाण आहे. येथून पुढे बंदिस्त नलिकेतून पाणी दिले जाणार आहे. तीनशे पन्नास किलोमीटर लांबीची बंदिस्त नलिका प्रणाली असणार आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यास जत तालुका १०० टक्के सिंचनाखाली येणार आहे. 

अशी आहे विस्तारित म्हैसाळ... 

  • ६४ गावांसाठी ही योजना 
  • ६० हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली आणणे 
  • ६५० कोटी अपेक्षित खर्च 
  • १७५ किलोमीटर बंदिस्त नलिकेद्वारे पाणी 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com