पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो कॉर्पोरेशनशी भागीदारी

मुंबई ः येथे महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स कंपनी आणि सुमितोमो कॉर्पोरेशन कंपनी यांच्यातील भागीदारीची घोषणा करताना अशोक शर्मा आणि तोमाकी तेत्सू.
मुंबई ः येथे महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स कंपनी आणि सुमितोमो कॉर्पोरेशन कंपनी यांच्यातील भागीदारीची घोषणा करताना अशोक शर्मा आणि तोमाकी तेत्सू.

मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स कंपनीने पीक संरक्षण क्षेत्रात एक पुढचे पाऊल टाकले आहे. पिकांची निगा राखण्याबाबत भविष्यातील गरज ओळखून ‘महिंद्रा’ने जपानी सुमितोमो कॉर्पोरेशन कंपनीसोबत नुकतीच (ता. १२) भागीदारीची घोषणा केली. जपानी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांची पीक उत्पादकता वाढविण्यास मदत होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.  महिंद्रा सुमित अॅग्री सायन्स लिमिटेड (एमएएसएल) असे या नव्या संयुक्त कंपनीचे नाव आहे. आजच्या घडीला कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे देशातील एकूण शेती उत्पादनापैकी अंदाजे ४० टक्के पीक वाया जाते. भविष्यात देशातील दरडोई क्षेत्र घटत जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादकतेत सुधारणा करूनच शेती उत्पादनात वाढ साधणे शक्य होणार आहे. त्यामुळे काढणीपूर्व व काढणीपश्चात पीक व्यवस्थापनात पिकांचे संरक्षण करणाऱ्या उत्पादनांचा विचार महत्त्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर महिंद्रा सुमित अॅग्री सायन्स लिमिटेडच्या भागीदारीमुळे पिकांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना अत्याधुनिक उत्पादने व साधने उपलब्ध होणार आहेत. ‘महिंद्रा’च्या पीक संरक्षण श्रेणीत कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, जैविक उत्पादने व पाण्यात विरघळणारी खते यांचा समावेश आहे.   सुमितोमा ही १९९२ पासून पीक संरक्षण क्षेत्रात कार्यरत असून सध्या ही कंपनी जगभरातील ३३ देशांत काम करीत आहे. त्यामुळे या संयुक्त भागीदारी कंपनीला दोन्ही कंपन्यांच्या क्षमतांचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांशी संपर्क, देशांतर्गत वितरण व शेतीतील कौशल्य याद्वारे महिंद्रा योगदान देणार आहे, तर सुमितोमो कॉर्पोरेशन पीक संरक्षण क्षेत्रातील मोठ्या व नाविन्यपूर्ण जपानी कंपन्यांच्या सहकार्यातून नवतंत्रज्ञान उपलब्ध करणार आहे. जपानी संशोधन व विकास केंद्रांशी सहकार्य असलेली संयुक्त भागीदार कंपनी असणारी एमएएसएल ही पहिली भारतीय कंपनी असणार आहे. यामुळे जपानमधील नवे तंत्रज्ञान व उत्पादने भारतीय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने मदत होणार आहे. प्रतिक्रिया...

पिकांचे काढणीपूर्व नुकसान कमी करण्यासाठी सुमितोमाशी भागीदारीतून नवे जागतिक तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा हेतू आहे. याद्वारे महिंद्राचा देशाच्या कृषी क्षेत्रातील विस्तार आणि सुमितोमाचे जागतिक कौशल्य यांची सांगड घालणे शक्य होणार आहे. या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावण्याचे आमचे ध्येय आहे. - अशोक शर्मा,  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स

या संयुक्त भागीदारीमुळे भारतीय शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व उत्पादने याबाबतीत नावीन्यपूर्ण सेवा उपलब्ध होऊ शकेल. तसेच त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी मदत होईल. -  तोमाकी तेत्सू, महाव्यवस्थापक, सुमितोमो कॉर्पोरेशन.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com